विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
By जितेंद्र कालेकर | Updated: January 9, 2026 19:22 IST2026-01-09T19:21:54+5:302026-01-09T19:22:07+5:30
घोडबंदर रोडवरील घटनेमुळे कार चालकासह चाैघे जखमी, दाेन तास वाहतूकीला खाेळंबा

विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
ठाणे: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्याजवळ घाटाच्या उतरणीवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दहा माेटारकार, एका रिक्षांसह ११ वाहनांना
एका ४० टनी सिमेंटच्या गाेणी वाहून नेणाऱ्या कंटेनरची जाेरदार धडक बसली. या अपघातामुळे रिक्षा चालक शिवकुमार यादव (५६, रा. काशीमीरा, ठाणे) यांच्यासह चाैघेजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे ठाणे ते घाेडबंदर आणि घाेडबंदर ते ठाणे
या दाेन्ही मार्गावर सुमारे दाेन तास वाहतूकीला खाेळंबा झाला हाेता. जखमींमध्ये रिक्षातील दाेन प्रवाशांचाही समावेश असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्याजवळ घाेडबंदर ते ठाणे या मार्गावर ठाण्यातून घाेडबंदर, काशीमीरा भागाकडे जाणारी एक माेटारकार चुकीच्या दिशेने गेली. तिच्याच मागे अन्यही काही वाहनांसह रिक्षा चालकांनीही चुकीचा मार्ग निवडला. त्याचवेळी घाेडबंदर ते ठाणे या मार्गावर उतरणीवरुन येणाऱ्या कंटेनरची जाेरदार धडक या वाहनांना बसली. या साखळी अपघातांत शिवकुमार यादव या रिक्षा चालकाच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. तर तस्कीन शेख (४५) आणि अनिता पेरवाल (४५) तसेच रामबली बाबूलाल (२२, कार चालक ) हे चाैघेजण जखमी झाले.
अपघातग्रस्त वाहने ही दोन्ही वाहिनीवर आल्याची माहिती एका प्रवाशाकडून मिळाल्यानंतर वाहतूक पाेलिस, आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. या विचित्र अपघाताच्या वेळी एका कारचा चालक कारमध्ये अडकला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच चाैघा जखमींनाही तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. इतर वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांनाही किरकोळ दुखापत झाली. ते स्वत: उपचारासाठी रुग्णालयात गेल्याने त्यांची नावे समजू शकली नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.
अपघातग्रस्त वाहनांधून रस्त्यावर ऑइल मोठ्या प्रमाणात सांडून ते रस्त्यावर पसरले होते. त्या ऑईलवर आपत्ती अग्निशमन दलाच्या जवानांनी माती पसरवून रस्ता सुरळीत केला. अपघातामुळे घाेडबंदर ते ठाणे मार्गावर दीड ते दाेन तासांचा खाेळंबा झाला हाेता. अपघातग्रस्त वाहने रोडच्या बाजूला केल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा झाला. परंतू, त्यानंतरही काही वेळ या मार्गावरुन कुर्म गतीने वाहतूक सुरु हाेती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
वाहनांचा चुराडा -
या अपघातात दहा कार, एका रिक्षा आणि एक कंटेनर अशा १२ वाहनांचे नुकसान झाले. यातील काही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला. रस्त्यावर वाहनांच्या तुटलेल्या काचांचा खच आणि तेल सांडले होते. गायमुख जकात नाका ते फाऊंटन पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या चालकांचे माेठया प्रमाणात हाल झाले. अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला.