जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करा, राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 18:24 IST2017-10-27T18:20:31+5:302017-10-27T18:24:52+5:30
दोन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौ-यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करा, राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिला सल्ला
डोंबिवली - दोन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौ-यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियाचा वापर करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि त्यांची काम करा असा सल्ला राज यांनी दिला. शुक्रवारी सकाळी सर्वप्रथम राज डोंबिवलीत दाखल झाले. तिथे त्यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले.
कल्याण-डोंबिवलीतील मनसे नगरसेवकांनी त्यांची कामे होत नसल्याचे गा-हाणे राज यांच्यासमोर मांडले. पदावर राहून काम न करणा-या पदाधिका-यांना हटवण्याचा इशाराही त्यांनी दिला. लोकसभा, विधानसभेनंतर दोनवर्षांनी झालेल्या महापालिका निवडणुकीतही मनसेचा दारुण पराभव झाला. त्यानंतर अनेक नेते, कार्यकर्ते मनसे सोडून दुस-या पक्षात गेले.
सध्या राज यांच्यासमोर पक्षाची पुर्नबांधणी करण्याचे आवाहन आहे. राज वेगवेगळया जिल्ह्यात जाऊन नेते, पदाधिकारी, शाखाध्यक्षांच्या भेटी घेत आहेत. राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील सर्वेश हॉलमध्ये डोंबिवली मनसेचे गटाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांसोबत अंतर्गत बैठक घेतली. सभागृहात अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्याला प्रवेश देण्यात आला नाही तसचं पोलिसांनाही बाहेर पाठवण्यात आलं.
कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेचे नऊ नगरसेवक आहेत. त्यात सुनंदा कोट या नगरसेविकेने पक्षाला अंधारात ठेवून शिवसेनेच्या सहकार्याने प्रभाग अध्यक्ष पद पटकाविले आहे. यावर ठाकरे काही भाष्य अथवा निर्णय देतात का याकडेही लक्ष लागले आहे.