Mira Bhayandar Municipal Corporation: टिपू सुलतानच्या विरोधात भाजपाने आक्रमक भूमिका मांडून वातावरण तापवले असतानाच मीरा भाईंदर महापालिकेच्या पहिल्याच महासभेत भाजपाने मीरारोड येथील चौकाचे टिपू सुलतान असलेले नाव रद्द करण्याचा प्रस्ताव आणला आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१६ सालच्या महासभेत भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनीच सदर चौकाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा ठराव मांडला व भाजपाने मंजूर केला होता.
मालेगाव महापालिकेतील उपमहापौर यांच्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावण्यावरुन आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्या वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यावरून टिपू सुलतान प्रकरणावरुन वातावरण तापवले जात आहे.
मात्र त्या आधीच मीरा भाईंदर महापालिकेत प्रचंड बहुमत मिळवल्या नंतर भाजपाने मीरारोड येथील एका चौकाचे टिपू सुलतान असे असलेले नामकरण रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या महासभेत आणला आहे. त्यावरून राजकारण आणि समाजकारण तापायला लागले आहे. टिपू सुलतान विरोधात भाजपाने आता आक्रमक भूमिका घेतली असली तरी मीरारोड येथील चौकाचे टिपू सुलतान असे नाव भाजपनेच दिल्याने याची चर्चा सुरु झालीय.
३ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत ठराव क्रमांक ९७ हा भाजपनेच केला आहे. मीरारोडच्या नया नगर, लोधा कॉम्प्लेक्स मार्ग वरील चौकाला हजरत टिपू सुलतान चौक असे नाव देण्याचा ठराव भाजपचे तत्कालीन नगरसेवक व आमदार नरेंद्र मेहता यांनीच मांडलेला आहे. त्या ठरावास भाजपच्या नगरसेविका वर्षा भानुषाली यांनी अनुमोदन दिले होते. तर भाजपच्या तत्कालीन महापौर गीता जैन यांनी ठराव सर्वानुमते मंजूर केला होता.
भाजपाने नाव बदलण्याचा प्रस्ताव आणला असला तरी भाजपाने २३ जून २०२१ रोजीच्या महासभेत ठराव करून शहरातील विविध रस्ते, चौक, सार्वजनिक जागा, महापालिकेच्या इमारती, पालिकेने विकसित केलेले आरक्षणे यांना पूर्वी दिलेल्या नावात बदल करण्यात येऊ नये असा ठराव केला आहे. विशेष म्हणजे तो ठराव महापौर डिंपल मेहता यांनीच त्यावेळी मांडलेला असून भाजपाचे दिनेश जैन यांनी त्याला अनुमोदन दिले होते. परिणाम स्वतःच घेतलेल्या निर्णय विरुद्ध महापौर यांनी प्रस्ताव आणला असल्याने त्यावरून देखील वादंग होण्याची शक्यता आहे.
Web Summary : BJP, once proposing Tipu Sultan's name for a Mira-Bhayandar square, now seeks to revoke it. Narendra Mehta, a BJP MLA, had originally introduced the naming resolution in 2016. This reversal sparks political debate, especially after BJP criticized Tipu Sultan's image elsewhere.
Web Summary : मीरा-भायंदर में भाजपा, जिसने कभी टीपू सुल्तान के नाम का प्रस्ताव रखा था, अब इसे रद्द करना चाहती है। नरेंद्र मेहता ने 2016 में प्रस्ताव पेश किया था। इस बदलाव ने राजनीतिक बहस छेड़ दी है, खासकर भाजपा द्वारा टीपू सुल्तान की छवि की आलोचना के बाद।