ठाण्याच्या कासारवडवलीतील घरातून चोरी करणारे दोन चोरटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:01 IST2020-07-17T23:59:22+5:302020-07-18T00:01:16+5:30
ब्रह्मांड येथील एका दुकानात घरफोडी करून ४० हजारांची रोकड लंपास करणाऱ्या रहीम मुस्तफा सैय्यद (२०, मीरा रोड) आणि चिन्मय संदीप सावंत (२०, कासारवडवली, ठाणे) या दोघांना कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.

कासारवडवली पोलिसांची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कासारवडवली परिसरातील ब्रह्मांड येथील एका दुकानात घरफोडी करून ४० हजारांची रोकड लंपास करणाºया रहीम मुस्तफा सैय्यद (२०, मीरा रोड) आणि चिन्मय संदीप सावंत (२०, कासारवडवली, ठाणे) या दोघांना कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन हजार २०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
कासारवडवली येथील ब्रम्हांड परिसरात ‘सॅम व्हेंचर’ या दुकानात २८ जून रोजी रात्री ९ ते २९ जून रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान काही चोरटयांनी ४० हजारांची रोकड चोरुन नेली होती. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये २९ जून रोजी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे या चोरटयांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार मीरा रोड आणि कासारवडवली परिसरात रहिम आणि चिन्मय हे दोघेही वास्तव्य करीत असल्याची माहिती जाधव यांच्या पथकाला मिळाली. त्याच आधारे १६ जुलै रोजी या दोघांनाही या दोन्ही परिसरातून अटक केली. त्यांच्या ताब्यातून काही रोकड हस्तगत करण्यात आली असून उर्वरित रकेबाबतही शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.