ठाणे - ठाणे मध्यवर्ती कारागृहातील न्यायबंदींना औषधोपचारासाठी कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना तेथून बाहेर खासगी वाहनाने हॉटेलात मद्य पार्टीसाठी जाण्यास मोकळीक देणाऱ्या ठाणे शहर मुख्यालयातील पोलिस हवालदार गिरीश पाटील आणि पोलिस हवालदार योगेश शेळके यांना शासकीय सेवेतून बडतर्फीची कारवाई पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शुक्रवारी केली.
ठाणे कारागृहातील सात कैद्यांना ठाणे पोलिस मुख्यालयामधील सध्या निलंबित असलेल्या गंगाराम घुले यांच्यासह नऊ पोलिस कर्मचाऱ्यांनी ४ ऑगस्ट २०२५ रोजी रुग्णालयात औषधोपचारासाठी नेले होते.
यावेळी फसवणुकीतील गुन्हेगार रमेशभाई पांबर आणि करण ढबालीया यांना चक्क एका रिक्षातून बाहेर हॉटेलात जेवणासाठी आणि मौजमजेसाठी बाहेर नेत ‘व्हीआयपी’ सेवा पुरविल्याची बाब मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांच्या तपासणीत उघड झाली.
यानंतर घुले यांच्यासह नऊजणांना पहिल्या टप्प्यात, तर शिवाजी गर्जे आणि दत्तात्रय जाधव या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर दुसऱ्या टप्प्यात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.