एकाच खोलीत दोन वर्ग; विद्यार्थी शिकतात रडतखडत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 09:44 IST2025-07-17T09:44:27+5:302025-07-17T09:44:59+5:30
सफाळेत धोकादायक शाळा पाडली; वर्ष उलटले तरी ढिगारा तसाच पडून

एकाच खोलीत दोन वर्ग; विद्यार्थी शिकतात रडतखडत
- रवींद्र घरत
लोकमत न्यूज नेटवर्क
सफाळे : सफाळे गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक बनल्याने वर्षभरापूर्वी पाडण्यात आली. मात्र, ती अद्याप बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे एका खोलीत दोन वर्गाच्या विद्यार्थ्यांना कोंबून शिकवले जात आहे. शाळेची इमारत बांधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे निधी नसल्याने विद्यार्थ्यांवर ही वेळ आल्याचे सांगण्यात येते.
साधारण वर्षभरापूर्वी धोकादायक वर्गखोली पाडण्यात आली. मात्र, ती पुन्हा बांधण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न केले नाहीत. आता पावसाळा असल्यामुळे बांधकाम करणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांना आणखी किती दिवस एकाच वर्गात बसून शिकावे लागणार, असा प्रश्न पालकांना सतावत आहे. जिल्हा परिषदेकडे रस्ते व इतर कामांसाठी निधी असतो, मग विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शाळेच्या इमारतीसाठी निधी का उपलब्ध होत नाही, असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे.
फाइल बघून सोमवार वा मंगळवारी माहिती देते!
जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. एक वर्षापूर्वी या शाळेचा वर्ग धोकादायक असल्याने पाडण्यात आला, तर दुसऱ्या दोन वर्गखोल्यांमध्ये पाणी गळती होत असल्याने दुरुस्ती करण्यात आली होती.
वर्षभरात जिल्हा परिषदेने एकही वीट रचलेली नाही. याबाबत प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सोनाली मतेकर यांनी “मी फाईल बघते, सोमवारी किंवा मंगळवारी माहिती देते”, असे सांगितले.
प्रशासनाने वेळेत बांधकाम पूर्ण न केल्याने विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसावे लागत आहे. ही बाब गंभीर आहे. यावर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी.
मनीषा निमकर, माजी सभापती, पालघर जिल्हा परिषद
सफाळे शाळेत चौथीपर्यंत वर्गखोल्या आहेत. त्यांची पटसंख्या ४४ असल्यामुळे तिथे वर्गखोली बांधणे शक्य नाही. कृष्णादेव सपटाले, सर्व शिक्षण अभियान, बांधकाम विभाग