Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 08:54 IST2025-12-01T08:53:21+5:302025-12-01T08:54:56+5:30
भाजपमधील अंतर्गत वाद मिटविण्यासाठी जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पालघर पोलिस ठाण्यात हजर राहावे लागले. मात्र, त्यांना अपयश आल्याने दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

AI Generated Image
पालघर : भाजपमध्ये उमेदवारीसाठी लाखो रुपये मागितले जात असल्याच्या आरोपातून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर शुक्रवारी (दि.२८) रोजी रात्री भाजपमधील दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. भाजपमधील अंतर्गत वाद मिटविण्यासाठी जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पालघर पोलिस ठाण्यात हजर राहावे लागले. मात्र, त्यांना अपयश आल्याने दोन्ही गटांवर विनयभंग, दुखापत, बेकायदा जमाव जमवणे आदी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर नगर परिषदेतील २५ वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढून भाजपचा झेंडा फडकविण्याचे आव्हान राजपूत यांनी दिले. त्यानंतर भाजपने शिंदे सेना, उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला.
उमेदवारीसाठी पाच लाख रुपये घेतल्याचा आरोप
आपल्याकडून उमेदवारी देण्याच्या नावाखाली ५ लाख रुपये घेतल्याचा आरोप एका महिला कार्यकर्त्याने केला. त्यानंतर लोकमान्य नगरमध्ये भाजपच्या दोन गटांत शुक्रवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. यात अनेक कार्यकर्ते जखमी झाल्यानंतर पालघर पोलिस ठाण्यात रात्री २ वाजेपर्यंत मोठी गर्दी जमली होती.
याप्रकरणी माझ्याशी एका भाजप पदाधिकाऱ्याने गैरवर्तन केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी एका महिला कार्यकर्तीने पालघर पोलिसांकडे केली. आता या प्रकरणाची पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
खासदार, जिल्हाध्यक्षांचा समन्वयाचा प्रयत्न अयशस्वी
दुसऱ्या दिवशी सकाळी भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आणि खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पालघर पोलिस ठाणे गाठून दोन्ही गटांत समन्वय साधण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही.
भाजपच्या माजी शहराध्यक्ष विरोधात विनयभंग, बेकायदा जमाव जमवणे आदी प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही गटांवरही गुन्हे दाखल झाल्याची माहिती पालघर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विनायक केसरकर यांनी दिली.