ठाण्यात स्मृतीदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:32 PM2020-10-21T23:32:52+5:302020-10-21T23:55:41+5:30

ठाण्यात पोलीस शहीद दिनानिमित्त बुधवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी देशभरातील २६४ शहीद पोलिसांना मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहिली. शहीदांना मानवंदना दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी शहीद कुटूंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

Tribute to the martyred police on the occasion of Memorial Day in Thane | ठाण्यात स्मृतीदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना

देशभरातील २६४ हुतात्म्यांचा समावेश

Next
ठळक मुद्दे पालकमंत्र्यांसह पोलीस आयुक्तांनी वाहिली श्रद्धांजली देशभरातील २६४ हुतात्म्यांचा समावेश पालकमंत्र्यांनी साधला शहीद कुटूंबीयांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी, यासाठी २१ आॅक्टोबर १९५९ पासून हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो. ठाण्यात यानिमित्त बुधवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी देशभरातील शहीद पोलिसांना मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहिली.
लडाख येथील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित अशा हॉटस्प्रिंग याठिकाणी पोलीस जवान २१ आॅक्टोबर १९५९ रोजी गस्त घालीत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला जवानांनी जशास तसे उत्तर दिले आणि अखेरच्या क्षणांपर्यंत झुंज दिली. या हल्ल्यात १० जवान शहीद झाले. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. बुधवारी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाजवळील स्व. निर्मलादेवी चिंतामण दिघे उद्यानातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून पालकमंत्री शिंदे, पोलीस आयुक्त फणसळकर यांनी सकाळी ८ वाजता श्रद्धांजली वाहिली.  महाराष्ट्रातील १४ शहीद हुतात्म्यांसह देशभरात शहीद झालेल्या २६४ हुताम्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सहपोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त प्रशांत मोहिते, बाळासाहेब पाटील, दीपक देवराज यांच्यासह शहीद पोलीस हवालदार भालचंद्र कर्डिले, शहीद पोलीस नाईक तुकाराम कदम, शहीद पोलीस हवालदार रमेश जगताप आणि शहीद पोलीस नाईक बाळू गांगुर्डे यांचे कुटुंबीय तसेच पोलीस कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी राज्य शासनाच्या वतीने शोक संदेशाचे वाचन केले. शहीदांना मानवंदना दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी शहीद कुटूंबीयांची भेट घेतली.
* यावेळी प्रथमच ठाण्यात शहीद झालेल्या चार पोलिसांची नावे स्मृतीस्तंभाच्या बाजूला कोरण्यात आली होती.

Web Title: Tribute to the martyred police on the occasion of Memorial Day in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.