कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी अखेर फुटणार, पलावा पूल नागरिकांसाठी खुला, ठाकरे गट, मनसेच्या आंदोलनाला यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:08 IST2025-07-04T13:06:02+5:302025-07-04T13:08:48+5:30
Kalyan-Sheel Road: ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी हा मागच्या अनेक वर्षांपासून येथून प्रवस करणाऱ्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरलेली आहे. त्यातच या मार्गावरील पलावा जंक्शन पुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं होतं. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत होती.

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी अखेर फुटणार, पलावा पूल नागरिकांसाठी खुला, ठाकरे गट, मनसेच्या आंदोलनाला यश
- मयुरी चव्हाण काकडे
ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी हा मागच्या अनेक वर्षांपासून येथून प्रवस करणाऱ्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरलेली आहे. त्यातच या मार्गावरील पलावा जंक्शन पुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं होतं. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत होती. दरम्यान, या संदर्भात मनसेचे नेते राजू पाटील यांनी वारंवार आवाज उठवला होता. याच पुलाच्या कामावरून ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. तसेच या दोघांनी पलावा पुलाच्या ठिकाणी आंदोलन देखील केलं होतं. या आंदोलनाची जोरदार चर्चाही झाली होती. दरम्यान, आता या आंदोलनाला यश आलं असून, हा पुल नागरिकांसाठी शुक्रवारी सकाळी खुला करण्यात आला.
पलावा एक्सपिरिया मॉल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन चालकांना येथे तासनतास रखडावं लागत होतं. त्यामुळे पलावा पुलाचं काम कधी पूर्ण होईल? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात होत. अखेर शुक्रवारी म्हणजेच ४ जुलै रोजी सकाळी हा पुल नागरिकांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे आज संध्याकाळी कामावरून घरी परतणारे चाकरमानी वेळेत घरी पोहोचतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी अखेर फुटणार, पलावा पूल नागरिकांसाठी खुला, शिवसेना ठाकरे गट, मनसेच्या आंदोलनाला यश #Palavabridge#Dombivalipic.twitter.com/J65LD13Qs9
— Lokmat (@lokmat) July 4, 2025
आश्चर्याची गोष्ट म्हणजे एरवी प्रत्येक उद्घाटनाचा गाजावाजा करणाऱ्या सत्ताधारी पक्षाने पलावा पुलाचे उद्घाटन करताना काहीसा सस्पेन्स राखला होता. शुक्रवारी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि काही निवडक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांना संपर्क साधला असता हा पूल खुला करण्यात आल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला.
दरम्यान, उशिरा का होईना हा पूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होताना दिसत आहे. त्यातच आता महापालिकेच्या निवडणुका देखील आलेल्या आहेत. त्यामुळे आता मतांचा जोगवा पदरात पाडून घेण्यासाठी राजकीय पक्षांकडून अनेक विकास काम मार्गी लागतील अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे.