पावसाच्या पाण्यामुळे घोडबंदर मार्गावर तीन तास वाहतूक ‘ब्लॉक’; काही काळासाठी दिला पर्यायी मार्ग: नादुरुस्त बसमुळेही कोंडीत भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:45 IST2025-08-19T16:45:29+5:302025-08-19T16:45:54+5:30
मीरा-भाईंदर मध्येही वर्सोवा, ठाणे भागातील काजू पाडा आणि चेना गाव या ठिकाणीही मोठया प्रमाणात पाणी साचल्यामुळे या भागातील वाहतूकही काही काळ बंद पडली होती.

पावसाच्या पाण्यामुळे घोडबंदर मार्गावर तीन तास वाहतूक ‘ब्लॉक’; काही काळासाठी दिला पर्यायी मार्ग: नादुरुस्त बसमुळेही कोंडीत भर
जितेंद्र कालेकर (ठाणे)
ठाणे: ठाणे घोडबंदर वाहिनीवर पावसामुळे पातलीपाडा, मानपाडा ब्रिजच्या , चितळसर पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० असा तीन तास हा मार्ग दोन्ही बाजूंनी बंद केला होता. तो दुपारी १.३० नंतर दोन्ही बाजूंनी एक मार्गाने सुरु केला. या मार्गावर दिवसभर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे सलग दुसºया दिवशी ठाणेकरांना या कोंडीचा फटका बसला.
मीरा-भाईंदर मध्येही वर्सोवा, ठाणे भागातील काजू पाडा आणि चेना गाव या ठिकाणीही मोठया प्रमाणात पाणी साचल्यामुळे या भागातील वाहतूकही काही काळ बंद पडली होती. त्यामुळे घोडबंदर रोड वरून मीरा-भाईंदर कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले होते.
वाहतूकीला दिला पर्यायी मार्ग -
घोडबंदर परिसरात राहणाºया नागरिकांनी ठाणे ते घोडबंदर कडे जातांना घोडबंदर मार्गाऐवजी पोखरण रोड क्रमांक दोन, मुल्लाबाग या मार्गाचा वापर करण्याचे तसेच घोडबंदरहून ठाण्याकडे जाताना आनंदनगर, वाघबीळ, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड कोलशेत या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.
घोडबंदर मार्ग तीन तास ठप्प-
घोडबंदर मार्गावर मोठया प्रमाणात (तीन ते चार फूट) पाणी भरल्यामुळे ठाणे ते घोडबंदर आणि घोडबंदर ते ठाणे हा मार्ग सकाळी १०.३० ते दुपारी १.३० असा तीन तास पूर्णपणे बंद पडला होता. दुपारी १.३० नंतर या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूने एका मार्गाने सुरु केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.
नादुरुस्त बसमुळे कोंडीमध्ये भर-
करपे कंपाऊंड भागात पाणी साचलेल्या ठिकाणी एकाच मार्गावर वाहतूक सुरु होती. त्यात गायमुख घाटातील खड्डयामध्ये सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास बस बंद पडली. त्यात ती नादुरुस्त झाल्यामुळे ही बस क्रेनच्या सहाय्याने तासाभराने बाजूला करण्यात आली. दुपारी ४ नंतर ही वाहतूक काही अंशी सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मुंब्रा, शीळ डायघर भागातही मोठया प्रमाणात पाणी भरल्यामुळे या भागातही सकाळी काही काळ वाहतूकीला खोळंबा झाला होता. या सर्व भागातील वाहतूक कोंडी सोडवितांना वाहतूक पोलिसांना मात्र चांगलीच कसरत करावी लागली.