मागोवा २०२०: ठाण्यातील विकासकामांना कोरोनामुळे लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 12:05 AM2020-12-27T00:05:48+5:302020-12-27T00:06:45+5:30

क्लस्टरच्या योजनेला गती दिली गेली आहे.

Track 2020: Development work in Thane comes to a halt due to corona | मागोवा २०२०: ठाण्यातील विकासकामांना कोरोनामुळे लागला ब्रेक

मागोवा २०२०: ठाण्यातील विकासकामांना कोरोनामुळे लागला ब्रेक

Next

-अजित मांडके

ठाणे :   मागील दोन वर्षांपासून ठाणे पालिकेने कोट्यवधींची अनेक मोठी विकासकामे हाती घेतली होती. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गतदेखील ४२ विकास प्रकल्प तयार केले. परंतु, मार्चपासून कोरोना महामारीने शिरकाव केल्याने काही महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना कात्री लावली असून काही निधीअभावी थांबवले आहेत. पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने एक हजार १०० कोटींहून अधिक खर्चाची कामेच बंद केली. त्यामुळे यंदाच्या वर्षात पालिकेला एकही नवीन प्रकल्प हाती घेता आला नाही. म्हणून क्लस्टरच्या योजनेला गती दिली गेली आहे.

क्लस्टरचा विकास
कोरोनामुळे क्लस्टर योजनेचा प्रकल्प लांबणीवर पडण्याची चिन्हे होती. परंतु, आता या योजनेला गती मिळाली असून पहिल्या सहा, त्यानंतरच्या सहा आराखड्यांचे सर्वेक्षण झाले आहे, तर तिसऱ्या टप्प्यातील नऊ आराखड्यांनाही मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली आहे. या विकासकामात आता म्हाडा आणि सिडकोची मदत घेतली आहे.

पूर्वेतील सॅटिस
ठाणे पूर्वेला सॅटिस प्रकल्प उभारण्याचे प्रयोजन केले. त्यानुसार विधानसभा निवडणुकीपूर्वी या कामाचा नारळही फोडला होता. परंतु, तो प्रकल्पही अपूर्ण आहे.
 

स्टेशनचे कामही रखडले
‘स्मार्ट सिटी’तून पालिकेने नवीन ठाणे स्टेशन विकसित करण्याचे प्रयोजन आखले होते. त्यानुसार कागदावरील घोडे नाचविले जात आहेत. परंतु प्रत्यक्षात या कामाला आजही मुहूर्त मिळालेला नाही.

चौपाटींचा विकास रखडला

अवघ्या १८ महिन्यांत कळवा, खारेगाव खाडीकिनारी पारसिक चौपाटीचा विकास केला जात आहे. परंतु, आता हा प्रकल्पही रखडला आहे. यासाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद आहे. परंतु प्रकल्प खर्चीक असल्याने, न्यायप्रविष्ट असल्याने या प्रकल्पाचे कामही रखडले आहे. याशिवाय वाघबीळ, कोपरी, नागला बंदर आणि इतर ठिकाणीही चौपाटींचा विकास केला जाणार होता. तसेच ११ कि.मी. खाडीकिनाऱ्याचा विकास केला जाणार होता, परंतु ते कामही कागदावरच आहे.

Web Title: Track 2020: Development work in Thane comes to a halt due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.