शहापुरातील प्रकरणात आणखी तीन शिक्षकांना अटक; शाळेची मान्यता रद्द होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 06:15 IST2025-07-11T06:15:30+5:302025-07-11T06:15:56+5:30
गुरुवारी सर्वांना न्यायालयात हजर केले होते, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

शहापुरातील प्रकरणात आणखी तीन शिक्षकांना अटक; शाळेची मान्यता रद्द होणार
शहापूर - शहापुरातील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मासिक पाळीच्या संदर्भात विद्यार्थिनींसोबत झालेल्या गैरवर्तन प्रकरणी गुरुवारी आणखी तीन शिक्षकांना अटक करण्यात आली. याप्रकरणी मुख्याध्यापिका व सफाई महिला कामगारांना बुधवारीच अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. अन्य तिघांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुरुवारी सर्वांना न्यायालयात हजर केले होते, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, जोपर्यंत संस्थाचालक खुलासा करीत नाहीत तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. संस्थाचालकांनी मुख्याध्यापिकेला बडतर्फ करण्याची कार्यवाही केली आहे. अधिकाऱ्यांच्या तपासणीत शाळेत तक्रार निवारण समिती नसणे, सखी सावित्री समितीची केवळ नोंद असणे अशा अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचा संस्थेचा निर्णय
जोपर्यंत संस्थाचालक आमच्यासमोर येऊन झालेल्या प्रकाराबद्दल खुलासा देत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठविणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतला होता. त्यामुळे गुरुवारी एकही विद्यार्थी शाळेत आला नाही. संस्थाचालकांनीही गुरुवारी, शुक्रवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी पालक व शिक्षकांची शाळेमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीस जिल्हा दक्षता समिती, पोलिस तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी हजर राहणार आहेत.
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या!
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गुरुवारी संबंधित शाळेला भेट दिली. तसेच पोलिस ठाण्यात जाऊन तपासाची माहिती घेतली. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होईल. हे टाळण्यासाठी शिक्षण विभागाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. तपास जलदगतीने पूर्ण करीत दोषारोपपत्र दाखल करावे, असेही त्यांनी सांगितले.