ठाण्यातील बाजारपेठेत चोरी करणारे तीन सराईत चोरटे जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 22:07 IST2021-05-28T22:04:00+5:302021-05-28T22:07:53+5:30
ठाण्याच्या बाजारपेठेतील दोन दुकानांमधील एक लाख ४९ हजारांची रोकड लंपास करणाऱ्या ओमकार रोशन पानकार (१९, रा. कोलशेत, ठाणे) याच्यासह तिघांनाही ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या तिघांनाही २९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठाणेनगर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्याच्या बाजारपेठेतील दोन दुकानांमधील एक लाख ४९ हजारांची रोकड लंपास करणाऱ्या ओमकार रोशन पानकार (१९, रा. कोलशेत, ठाणे) याच्यासह तिघांनाही ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून ८५ हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
बाजारपेठेतील टाऊन ट्रेडर्स आणि मित ट्रेडर्स या दोन दुकानांमध्ये २३ मे २०२१ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास शटर उचकटून ओमकारसह त्याच्या दोन साथीदारांनी रोकड लुटली होती. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी आणि पोलीस निरीक्षक आबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते, पोलीस हवालदार गणेश पोळ, पोलीस नाईक सुनिल गांगुर्डे आणि विक्रम शिंदे आदींच्या पथकाने केवळ तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आधी २५ मे रोजी ओमकार याला अटक केली. त्यापाठोपाठ नासीर खान (२०, रा. कोलशेत, ठाणे) आणि चैतन्य काल्लूर (२१, रा. तुर्भे, नवी मुंबई) या दोघांना अटक केली. चोरीच्या वेळी दोघेजण दुकानात तर एकजण एका रिक्षाजवळ उभा असलेले सीसीटीव्ही चित्रण या पथकाच्या हाती लागले. त्यानंतर या तिघांचीही धरपकड करण्यात आली. त्यांच्याकडून ८६ हजार ९०८ रुपयांची रोकड आणि रिक्षा असा तीन लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिघांनाही २९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.