नायजेरियनसह तिघांना अटक; २.१५ कोटींचे एमडी व कोकेन जप्त, कल्याण परिमंडळ तीनची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 19:20 IST2026-02-14T19:17:37+5:302026-02-14T19:20:54+5:30
तिघांच्या अंगझडतीत त्यांच्याकडे २ कोटी ८० हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन व १५ लाख रुपये किमतीचे कोकेन असा अंमली पदार्थ सापडला.

नायजेरियनसह तिघांना अटक; २.१५ कोटींचे एमडी व कोकेन जप्त, कल्याण परिमंडळ तीनची कारवाई
डोंबिवली : पूर्वेकडील गणेश नगर, उंबर्ली गाव परिसरात कल्याण परिमंडळ तीनच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष कारवाई करत एका ३६ वर्षीय नायजेरियन नागरिकासह अविनाश व्यंकटेश सदरला (३४) आणि गजेंद्रन संजीव नायडू (३४ दोघेही रा. अंबरनाथ) या तिघा अंमली पदार्थ विक्रेत्यांना शुक्रवारी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून सुमारे २ कोटी १५ लाख ८० हजार रुपये किंमतीचे मेफेड्रोन व कोकेन जप्त करण्यात आले. कल्याण न्यायालयाने तिघांनाही १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक गस्तीवर असताना सार्वजनिक रस्त्याच्या कडेला संशयास्पद हालचाली करत असताना हे तिघे पोलिसांना आढळले. त्यापैकी एक जण पाठीवर बॅग घेऊन दुचाकीवर बसला होता. दुचाकीच्या पुढील व मागील नंबर प्लेट वाकविलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पथकाने चौकशीसाठी जवळ जाताच तिघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परतेने त्यांना ताब्यात घेतले.
तिघांच्या अंगझडतीत त्यांच्याकडे २ कोटी ८० हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन व १५ लाख रुपये किमतीचे कोकेन असा अंमली पदार्थ सापडला. याशिवाय २१,५०० रुपयांची रोख रक्कम, एक दुचाकी आणि एक काळी बॅग असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.