ठाणे जिल्ह्यात पुरामुळे हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने दिवसभर झोडपून काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 07:45 IST2025-09-30T07:45:31+5:302025-09-30T07:45:55+5:30
जिल्ह्यात शनिवार, रविवार मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी पाणी थेट निवासी भागात शिरले.

ठाणे जिल्ह्यात पुरामुळे हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने दिवसभर झोडपून काढले
ठाणे : जिल्ह्यात शनिवार, रविवार मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी पाणी थेट निवासी भागात शिरले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधी जिल्हा व तालुका प्रशासनाने कार्यवाही करत नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केल्याने जीवितहानी टळली.
जिल्ह्यातील विविध पूरप्रवण भागांतून नागरिकांचे स्थानिक शाळा, आश्रमशाळा, गाळे, नातेवाइक यांच्याकडे स्थलांतर केले. त्यामध्ये वसतिगृहात राहणारे विद्यार्थी, महिला, वृद्ध यांचा समावेश आहे. स्थलांतर झालेल्यांमध्ये वासिंदमधील साईनील अपार्टमेंटमधील ३२ कुटुंबांमधील १४७ जणांचे सरस्वती विद्यालयात स्थलांतर केले. वासिंदच्या जिजामातानगरमधील १२७ जणांना त्यांच्या नातेवाईकांकडे पाठविले. भातसई येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेच्या इमारतीमध्ये तब्बल १५८ रहिवाशांचे स्थलांतर करावे लागले.
धान्य, कपड्यांचे माेठे नुकसान
नाल्यांचे पाणी घरांमध्ये शिरल्याने कपडे, भांडी, घरोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले. भिवंडीच्या कुंदे, अन्हे येथील तीन रहिवासी, चिरपाडा येथील दाेन कुटुंबे, तर कसारा बु, विठ्ठलवाडी येथील दाेन कुटुंबीयांचे कपडे, भांडी पुरामुळे नुकसान झाले.
शाळांमध्ये आसरा
भिवंडीच्या चिरापाड्यातील ३२ जणांचे जि. प. शाळेत, तर काेनगावमधील ८० जणांनी उर्दू शाळेत आसरा घेतला. खडवली येथील १५० रहिवाशांना जिल्हा परिषद शाळेत हलविले. कल्याणच्या १९० जणांना मनपा शाळांमध्ये स्थलांतरित केले आहे.