ठाण्यात डीजेचा दणदणाटच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 03:45 IST2018-09-18T03:43:30+5:302018-09-18T03:45:19+5:30
मनसे, राष्ट्रवादीची भूमिका; शिवसेना मात्र न्यायालयीन आदेश पाळणार

ठाण्यात डीजेचा दणदणाटच
ठाणे : गणपती विसर्जन मिरवणुकीत उच्च न्यायालयाने डीजे वाजविण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागातील वातावरण ढवळून निघाले आहे. परंतु, न्यायालयाचा अंतिम निर्णय काहीही येवो आम्ही विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट करणारच, अशी ठाम भूमिका ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्टÑवादीने घेतली आहे. तर शिवसेनेने मात्र आम्ही न्यायालयाच्या अधीन राहूनच विसर्जन मिरवणूक काढू, असे स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवू नये, असे स्पष्ट केले आहे. या संदर्भातील पुढील निकाल १९ सप्टेंबर रोजी लागणार आहे. याच अनुषंगाने सोमवारी डिजे संघटनांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. परंतु, न्यायालयाच्या निर्णयापर्यंत त्यांनी या सर्वांना थांबण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. दुसरीकडे खासदार उदनराजे भोसले यांनी तर काही झाले तरी विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजणारच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. आता ठाण्यातही राष्टÑवादी आणि मनसेने हीच भूमिका घेऊन विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट होणारच, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या विसर्जन मिरवणुकींकडे सर्वांचेच लक्ष लागलेआहे.
न्यायालय आता प्रत्येक वेळेस दैनंदिन जीवनातही हस्तक्षेप करू लागले आहे. माणसाने कसे जगयाचे, आवाज किती करायचा याचा निर्णय जर न्यायालयच घेणार असेल तर सर्वसामान्यांनी करायचे काय? असे मत राष्टÑवादीने व्यक्त केले. तर प्रत्येक वेळेस सणांच्या काळात अशा अडचणी येत आहेत, त्यावर मात करण्याची वेळ आल्याचे मनसेने म्हटले आहे.
कोर्टाचे आदेश जे काही येतील तेव्हा येतील. परंतु, आम्ही कोणत्याही परिस्थितीत विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवणारच.
- अविनाश जाधव - ठाणे जिल्हा अध्यक्ष, मनसे
दरवर्षी ज्या पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढली जाते त्याच पद्धतीने यंदाही ती काढली जाईल. यात कोणताही बदल केला जाणार नाही, डीजे हा वाजवणारच.
- जितेंद्र आव्हाड - आमदार, राष्टÑवादी
न्यायालयाने घालून दिलेल्या निर्णयानुसारच आमची सर्व मंडळे विसर्जन मिरवणूक काढतील. परंतु, डीजे असणार नाही.
- नरेश म्हस्के - जिल्हाप्रमुख, शिवसेना - ठाणे