...हा तर यमलोकी जाण्याचा मार्ग! मुंबई-अहमदाबाद मार्गावर तब्बल २० हजार खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:30 IST2025-07-25T13:29:43+5:302025-07-25T13:30:19+5:30

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच्या नेहमीच्या वाहतूक कोंडीला प्रवासी आणि नागरिक कंटाळले असून पालकमंत्र्यांनी अनेक बैठका घेऊनही ही समस्या दूर होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

...This is the way to Yamaloki! As many as 20,000 potholes on the Mumbai-Ahmedabad route | ...हा तर यमलोकी जाण्याचा मार्ग! मुंबई-अहमदाबाद मार्गावर तब्बल २० हजार खड्डे

...हा तर यमलोकी जाण्याचा मार्ग! मुंबई-अहमदाबाद मार्गावर तब्बल २० हजार खड्डे

हितेन नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क

पालघर :मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या निकृष्ट दर्जा आणि अपघातामुळे शेकडो प्रवाशांच्या मृत्यूविरोधात तीन वर्षांपासून अनेक आंदोलने, तक्रारी करूनही ठेकेदाराविरोधात कारवाईचे धारिष्ट्य पालकमंत्री आणि त्यांचे सरकार तीन वर्षांत दाखवू शकलेले नाही. आमदार राजेंद्र गावित यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समिती सभेत या महामार्गावर २० हजार खड्डे पडल्याचा आरोप केला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच्या नेहमीच्या वाहतूक कोंडीला प्रवासी आणि नागरिक कंटाळले असून पालकमंत्र्यांनी अनेक बैठका घेऊनही ही समस्या दूर होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग ४८ चे काम नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियाने निर्मल बिल्ड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतले आहे. महामार्गावर दोनशे मिमी जाडीचा काँक्रीट थर अंथरण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ५५४ कोटींचा खर्च मंजूर केला होता.

२०२३ पासून सुरू असलेल्या या कामामुळे वाहन चालक आणि नागरिकांना चांगल्या रस्त्याचा लाभ मिळणे, अपेक्षित असताना ठेकेदारांनी बनवलेल्या निकृष्ट आणि नियोजनशून्य कामांचा पुरता फज्जा उडाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडी याकडे प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

आश्वासन ठरले फोल

पालकमंत्र्यांच्या मागील बैठकीत नॅशनल हायवे ऑथोरिटीचे अधिकारी सुहास चिटणीस यांनी ३ जूनपर्यंत समस्यांचे निराकरण केले जाईल, असे आश्वासन दिले होते. ते फोल ठरले आहे.

मार्गावरील घोडबंदर ते तलासरीदरम्यान रस्त्यावर २० हजार खड्डे पडल्याने हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी पक्षाचे आमदार राजेंद्र गावित यांच्यासह सर्व आमदारांनी बैठकीत केला.

कारखानदारांना फटका

तारापूर एमआयडीसी, पालघर बिडको, एमआयडीसी येथील कारखानदारांना कोट्यवधींचा फटका बसला असून शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. मार्गावरील समस्येच्या निराकरणासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत डझनभर बैठका घेतल्या असून त्यातून काहीही निष्पन्न होत नसल्याने अपघात व मृत्यूच्या घटना वारंवार घडत आहेत, याकडे सभेत लक्ष वेधण्यात आले.

Web Title: ...This is the way to Yamaloki! As many as 20,000 potholes on the Mumbai-Ahmedabad route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.