ठाण्यातील त्या खवल्या मांजराला मुक्तसंचारासाठी पाचाडच्या जंगलात सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 20:09 IST2018-10-13T20:03:11+5:302018-10-13T20:09:18+5:30
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात दुर्मिळ प्राण्याच्या तस्करीचे प्रकार वाढल्याचे पोलीस कारवाईने स्पष्ट दिसत आहे.

ठाण्यातील त्या खवल्या मांजराला मुक्तसंचारासाठी पाचाडच्या जंगलात सोडले
ठाणे : नष्ट होत चाललेल्या दुर्मीळ प्रजातीतील खवल्या मांजराच्या सुटकेनंतर त्याला ठाणे शहर पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने रायगडमधील पाचाडच्या जंगलात मुक्तसंचारासाठी सोडून दिले आहे. तर, याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना १६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील बाळकुम परिसरात खवले मांजर विक्रीसाठी आलेल्या देवजी सावंत (४२), संजय भोसले (४६) आणि रामदास पाटील (५६) या तिघांना ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री अटक करून १० किलो वजन आणि ९२ सेमी लांबीची मादी असलेल्या मांजराला ताब्यात घेतले होते. ते त्यांनी रायगड जिल्ह्यातील जंगलातून पकडून विक्रीसाठी आणल्याचे तपासात पुढे आले आहे. या कारवाईनंतर ठाणे पोलिसांनी ते मांजर शुक्रवारी रात्री वनविभागाच्या मदतीने पाचाडच्या जंगलात मुक्तसंचारासाठी सोडून दिले. तसेच ते मांजर नेमके कोणाला विकणार होते, याबाबत अद्यापही माहिती पुढे आली नसून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल करत आहेत.
.....................