कळवा रुग्णालयात इंन्टेसिव्हीट व अधिव्याख्यातांची होणार भरती
By अजित मांडके | Updated: August 23, 2023 15:54 IST2023-08-23T15:53:32+5:302023-08-23T15:54:33+5:30
कळवा रुग्णालयात मागील आठवड्यात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यात आणखी चार रुग्णांची भर पडली होती.

कळवा रुग्णालयात इंन्टेसिव्हीट व अधिव्याख्यातांची होणार भरती
ठाणे : कळवा हॉस्पिटलमध्ये झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्युनंतर येथील मनुष्यबळाचा विषय देखील चर्चेत आला होता. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ७२ नर्सची भरती करण्याची प्रक्रिया हाती घेतली असतांना आता आयसीयुत काम करणारे इंन्टेसिव्हीट व अधिव्याख्यातांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी थेट मुलाखतींच्या माध्यमातून ही भरती केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यात २८ अधिव्याख्याते आणि ९ इंन्टेसिव्हीट घेतले जाणार आहेत.
कळवा रुग्णालयात मागील आठवड्यात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यात आणखी चार रुग्णांची भर पडली होती. या दुर्देवी घटनेनंतर या ठिकाणी असलेल्या अनेक असुविधांची चर्चा झाली होती. तसेच येथील अपुºया मनुष्यबळावर देखील अनेकांनी आक्षेप घेतला होता. कळवा रुग्णालयात १२५ शिकाऊ आणि १५० च्या आसपास तज्ञ डॉक्टर आहेत. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून डॉक्टर व इतर महत्वाची पदे भरण्याची तयारी केली होती. परंतु कमी पगार असल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
दरम्यान मागील आठवड्यात झालेल्या दुर्देवी घटनेनंतर आता पुन्हा एकदा आरोग्य विभागाने रिक्त पदे भरण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. आता आरोग्य विभागाने ७२ पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याची तयारी सुरु केली आहे. यापुढे जाऊन आयसीयु विभागात महत्वाचे मानले जाणारे ९ इंन्टेसिव्हीट भरती केले जाणार आहेत. यापूर्वी ११ पदांसाठी महापालिकेने मुलाखती घेतल्या होत्या. त्याला केवळ २ उमेदवारांनी पंसती दिली होती. उर्वरीतांनी कमी पगार म्हणून माघार घेतली होती. आता मात्र पुन्हा ९ पदांची भरती करण्याची तयारी केली आहे.
दुसरीकडे २८ अधिव्याख्यातांची पदे देखील भरली जाणार आहेत. यात बायोकेमिस्ट्री ०१, फार्मकॉलजी ०३, पी.एस.एम. ०४, जनरल मेडीसीन ०३, स्किन ०१, पीडीयाट्रीक ०१, सर्जरी ०५, ओबीजीवाय ०४, अॅनेस्थेशिया ०४ आणि इमर्रजन्सी मेडीसीन ०१ व फिजिकल मेडीसीन अॅण्ड रिहॅबिलीटीशन ०१ आदींचा समावेश आहे.
वाढीव पगार
यापूर्वी देखील महापालिकेने या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र पगार कमी असल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरविली होती. आता मात्र महापालिकेने वाढीव पगार देण्याची तयारी केली आहे. त्याला आता प्रतिसाद मिळतो का? हे पाहावे लागणार आहे.