अक्षयचे पालक संपर्कातच नाहीत; दीड महिन्यापासून ते अंबरनाथमध्येही आलेले नाहीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 06:34 IST2025-04-08T06:33:49+5:302025-04-08T06:34:25+5:30
कोर्टात दाद मागण्यासाठी ज्या वकिलाची नेमणूक केली होती त्या वकिलाच्यादेखील ते संपर्कात नसण्याची बाब समोर आली आहे.

अक्षयचे पालक संपर्कातच नाहीत; दीड महिन्यापासून ते अंबरनाथमध्येही आलेले नाहीत?
लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर : बदलापुरातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेत झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानंतर अक्षय शिंदे याचे पालक संपर्कात आलेले नाहीत. एवढेच नव्हेतर, कोर्टात दाद मागण्यासाठी ज्या वकिलाची नेमणूक केली होती त्या वकिलाच्यादेखील ते संपर्कात नसण्याची बाब समोर आली आहे.
न्यायालयाने एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर अक्षय याचे पालकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बदलापुरातील त्यांच्या निवासस्थानीही घराला कुलूप होते तर दुसरीकडे अक्षयच्या मावशीकडे अंबरनाथमध्ये वास्तव्यास असलेले अक्षयचे पालक त्या ठिकाणावरून निघून गेल्याची माहिती समोर येत आहे. पालक कोणाच्याही संपर्कात आलेले नाहीत. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी त्याच्या पालकांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यासाठी वकील अमित कटरनवरे यांची नेमणूकदेखील करण्यात आली होती. मात्र, ज्या दिवशी न्यायालयात शिंदे यांच्या पालकांनी केस लढण्याची इच्छा नसल्याचे विधान केले त्या दिवसापासून शिंदे हे वकिलांच्याही संपर्कात नाहीत.
यासंदर्भात कटरनवरे यांना विचारले असता अक्षयच्या पालकांनी केस लढण्यास नकार दिल्यापासून ते माझ्याही संपर्कात नाहीत. ते कुठे आहेत आणि कोणत्या परिस्थितीत आहेत याची आपल्याला कल्पना नाही. दीड महिन्यापासून ते अंबरनाथमध्येही आलेले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.