अकरा महिने कठोर कायदा अभियानाची गरज; अभिनेते मकरंद अनासपूरे यांचे प्रांजळ मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 14:53 IST2021-02-07T14:49:18+5:302021-02-07T14:53:18+5:30
Thane Traffic Police : अकरा महिने कठोर कायदा अभियानाची गरज

अकरा महिने कठोर कायदा अभियानाची गरज; अभिनेते मकरंद अनासपूरे यांचे प्रांजळ मत
ठाणे : वाहतुकीचे नियम प्रत्येकालाच माहित असतात.परंतु, त्यांचे पालन करण्याऐवजी ते तोडण्याचीच स्पर्धा लागलेली असते. या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रेमाने सुसंवाद साधताना वाहतूक पोलीस दिसतात. मात्र, वाहतुकीला शिस्त आणि अपघातांवर प्रभावी नियंत्रण ठेवायचे असेल तर पुढील ११ महिने कठोर कायद्यांचा बडगाही पोलिसांनी उगारावा. त्यासाठी कठोर कायदा अभियान राबवा, अशी विनंती वजा सूचना सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपूरे यांनी रविवारी केली.
ठाणे वाहतूक पोलिसांच्या वतीने आयोजित केलेल्या सुपर बाईक रॅलीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेखला, माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी, अभिनेता अभिजीत खांडकेकर, अभिनेत्री अनिता दाते, ठाणे वाहतूक पोलिसांचे ब्रँण्ड अँम्बेसेडर मंगेश देसाई, वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या रॅलीत सहभागी झाले होते. त्यावेळी अनासपूरे बोलत होते.
विस्तारणा-या महानगरांसोबत रस्तेही विस्तारले आहेत. परंतु, त्यावर असंख्य खड्डे असतात. खड्डे चुकविताना आजवर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा अपघातांमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. आपल्या सुरक्षेची काळजी आणि अपघाताची जबाबदारी घ्यायला कुणीही पुढे येणार नाही. ही खबरदारी आपल्यालाच घ्यायची आहे. कोरोना संक्रमाणाच्या काळात आपण तोंडावर मास्क घालायला आणि सॅनिटायझर्स वापरायला शिकलो. तसेच, मोटारसायकल चालविताना कायम हेल्मेट घालायलाही शिका, असा सल्लाही अनासपूरे यांनी दिला. प्रत्येकाने नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर वाहतूक पोलिसांना अशा जनजागृती मोहिमा राबवाव्या लागणार नाहीत. तो दिवस लवकरच येईल, अशी आशा अभिजीत खांडकेकर यांनी व्यक्त केली.
वाहनचालकांना सुपर बुद्धी मिळो
कोरोनाच्या रुपाने निसर्गाने मानव जातीला मोठी शिक्षा दिली. त्यानंतर आजही अनेकांना तोंडावरील मास्कचे वावडे का वाटते, हे मला कळत नाही. निसर्गाच्या एवढ्या मोठ्या शिक्षेनंतरही आपण जर धडा घेत नसू तर दोन - पाचशे रुपयांच्या दंडाचा आपल्यावर किती परिणाम होईल असाही प्रश्न मला पडतो. पंरतु, सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन अत्यावश्यक आहे. त्यामुळे तुमच्याकडे जशी सुपर बाईक आहे तशी प्रत्येक वाहनचालकाला नियमपालनासाठी सुपरबुद्धी मिळावी, अशी सदिच्छा पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी व्यक्त केली. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कोरोना संक्रमाणाच्या काळातही अविरत सेवा देणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांचे त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसाही केली.
ठाणे शहरात दिमाखदार संचलन
सकाळी ८ वाजता मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रॅलीला सुरूवात झाली. हर्ले डेव्हिडसन, डुकाटी, बीएमडब्ल्यू, यामाहा, रॉयल एन्फिल्ड, निंजा, कावासाकी, अप्रिलिया यांसारख्या जवळपास ३०० सुपर बाईक्स या संचलनात सहभागी झाल्या होत्या. या बाइकर्सनी ठाणे शहरांत सुमारे २० किमीचे संचलन या बाइकर्सनी केले. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी लोटली होती. यावर्षी पहिल्यांदाच रॅलीच्या मार्गावर १० ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यात आरएसपीचे विद्यार्थी, रिक्षा संघटनां, मोटार ड्रायव्हींग स्कुल आणि अन्य समाजसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या.