Thane: इंग्रजी शाळेसाठी मराठी शाळेची गळचेपी होणार का? पालकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 21:10 IST2025-07-26T21:10:23+5:302025-07-26T21:10:57+5:30
Thane News: शालेय कामकाजाचे कारण देत सरस्वती मंदिर ट्रस्टच्या मराठी माध्यमाच्या शाळेला अचानक सुट्टी दिल्याचा आरोप करीत शनिवारी शाळेसमोर पालकांनी जमाव केला आणि शाळेविरोधात असंतोष व्यक्त केला.

Thane: इंग्रजी शाळेसाठी मराठी शाळेची गळचेपी होणार का? पालकांचा आरोप
ठाणे - शालेय कामकाजाचे कारण देत सरस्वती मंदिर ट्रस्टच्या मराठी माध्यमाच्या शाळेला अचानक सुट्टी दिल्याचा आरोप करीत शनिवारी शाळेसमोर पालकांनी जमाव केला आणि शाळेविरोधात असंतोष व्यक्त केला. सीबीएसई शाळेच्या तपासणीसाठी समिती आल्याने मराठी माध्यमाची गळचेपी होईल अशी भिती पालकांनी व्यक्त केली. मात्र मराठी शाळेचे भवितव्य उज्ज्वलच आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे असे मत विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
सरस्वती मंदिर ट्रस्ट संचलित मराठी माध्यमाच्या शाळेला शनिवारी सुट्टी देण्यात आली तर शुक्रवारी ही शाळा अर्ध्या दिवसाने सोडण्यात आली. याबाबत पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मराठी शाळा बंद होणार असल्याचे मेसेज फिरु लागले असे पालकांनी सांगितले. याबद्दल विचारणा करण्यासाठी तब्बल चार तास पालक बाहेर उभे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही तासांनी पालकांच्या आग्रहास्तव विश्वस्तांनी पालकांना आत घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. पालकांचे म्हणणे होते की, सीबीएसई शाळेला मान्यता देण्यासाठी दिल्लीहून तपासणी समिती येणार होती तर त्याची कल्पना मराठी माध्यमाच्या पालकांना द्यायला होती. तसेच, इंग्रजी माध्यमासाठी मराठी माध्यमाचे फलक का काढण्यात आले? शाळेची नविन उभी राहीलेली वास्तूसाठी माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक हातभार लावला आहे मग या शाळेतील मराठी माध्यमाची मुले दुसऱ्या इमारतीत स्थलांतरीत करणार का? शाळा प्रशासनाने मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्वासात का घेतले नाही? शाळेकडून मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांमध्ये दुजाभाव का केला जातोय असे अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले.
सीबीएसईसी शाळेच्या मागे मराठी शाळेची गळचेपी होतेय का? पालकांच्या वर्गणीतून मराठी शाळेची इमारत बांधली आहे. त्यामुळे अचानक सुट्टी का दिली याचे खरे कारण शाळा व्यवस्थापनाने द्यायला हवे होते. पालकांसोबत विश्वस्तांशी माझे बोलणे झाले असून ते सोमवारी पालकांशी संवाद साधणार आहेत. - संगम डोंगरे
मराठी शाळेचे भवितव्य उज्जवल आहे. पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही. सीबीएसई शाळेच्या तपासणी हे रुटीन होते आणि ते व्हायलाच हवे. जी समिती आली होती ती शाळेच्या मान्यतेसाठी आली होती. आज शेवटचा शनिवार असल्याने मुलांना सुट्टी दिली होती आणि याची पुर्वकल्पना पालकांना दोन दिवस आधीच दिली होती. - सुरेंद्र दिघे, विश्वस्त, सरस्वती मंदिर ट्रस्ट