साथीच्या आजारांचा ठाणेकरांचा ताप होणार कमी; मिळणार तत्काळ उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 09:46 IST2025-10-01T09:46:26+5:302025-10-01T09:46:49+5:30

ठाण्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर साथरोग नियंत्रण केंद्र

Thane residents' fever due to epidemic diseases will decrease; they will get immediate treatment | साथीच्या आजारांचा ठाणेकरांचा ताप होणार कमी; मिळणार तत्काळ उपचार

साथीच्या आजारांचा ठाणेकरांचा ताप होणार कमी; मिळणार तत्काळ उपचार

ठाणे : पावसाळा अजूनही सुरूच असून सर्दी, ताप, खोकला, गॅस्ट्रो अशा साथीच्या आजारांचा विळखा ठाण्यालाही पडला आहे. परंतु, ठाणेकरांच्या डोक्याचा ताप आता कमी होणार आहे. ठाण्यात साथरोग नियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे. कोरोनानंतर साथीच्या आजारांचा लोकांनी धसकाच घेतला आहे. त्यामुळे साथीच्या आजारांना आळा घालण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ठाण्यात मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट सुरू करण्यात येणार आहे. येत्या २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याचा प्रारंभ होणार असून, या युनिटचा फायदा ठाणे जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या ठिकाणांनादेखील होणार आहे.

 कोरोनानंतर केंद्र शासनाने अशा प्रकारच्या आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठी साथ आटोक्यात ठेवण्यासाठी संपूर्ण देशभर अशा प्रकारचे युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ठाणे महापालिकेने यासाठी माजिवडा येथे हे युनिट उभारण्यासाठी जागा दिली आहे. या युनिटच्या माध्यमातून  एखाद्या आजाराची साथ ठाण्यात किंवा जिल्ह्यात पसरली असेल, तर त्याची प्रमुख कारणे शोधणे, तसेच त्या आजाराचे मूळ शोधले जाणार जाईल. त्यावर कशा प्रकारे उपाययोजना करणे गजरेचे आहे, याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. याठिकाणी डॉक्टर तैनात केले जाणार आहेत. 

ही असणार महत्त्वाची पदे
वरिष्ठ पब्लिक हेल्थ तज्ज्ञ     ०१
पब्लिक हेल्थ तज्ज्ञ     ०१
मायक्रोबायोलॉजिस्ट     ०१
फूड सेफ्टी तज्ज्ञ     ०१
रिर्सच असिस्टंट     ०२
आदींसह इतर महत्त्वाची २३ पदे भरली जाणार आहेत.

खर्च केंद्र सरकार करणार
हा केंद्र सरकारचा उपक्रम असल्याने यासाठी असलेल्या युनिटची निगा, देखभाल, येथील तज्ज्ञांचा पगार आदींसह सर्वच जबाबदारी केंद्राची असणार आहे.  ठाणे महापालिका केवळ येथील डॉक्टरांची भरती करणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात केंद्राकडून ३ कोटी १८ लाखांचा निधी प्राप्त झाला.

Web Title: Thane residents' fever due to epidemic diseases will decrease; they will get immediate treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.