ठाण्यात पावसाची २८ तासात डबल सेन्चुरी; मंगळवारी दुपार पर्यंत ७५.४२ मीमी पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:44 IST2025-08-19T16:43:07+5:302025-08-19T16:44:01+5:30

ठाणे शहरात शनिवारपासून पाऊस सुरू आहे. त्यानंतर रविवार आणि सोमवारी देखील पावसाने जोरदार बॅटींग केली. त्यानंतर शहरात मागील २८ तासात विक्रमी २८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Thane receives double century of rainfall in 28 hours; 75.42 mm of rainfall recorded till Tuesday afternoon | ठाण्यात पावसाची २८ तासात डबल सेन्चुरी; मंगळवारी दुपार पर्यंत ७५.४२ मीमी पावसाची नोंद

ठाण्यात पावसाची २८ तासात डबल सेन्चुरी; मंगळवारी दुपार पर्यंत ७५.४२ मीमी पावसाची नोंद

अजित मांडके (ठाणे)

ठाणे : रविवारी पासून जोर धरलेल्या पावसाने मागील २८ तासात शहरात २८५ मीमी पावसाची नोंद केली आहे. सोमवारी दमदार बरसल्यानंतर मंगळवारी सकाळ पासून पावसाने आपले रौद्र रुप ठाणेकरांना दाखविले. दुपार पर्यंत शहरात ७५.४२ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे अनेक परिसर जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. घोडबंदर भागातील मानपाडा, पातलीपाडा, गायमुख, काजुपाडा येथे रस्त्यावरच पाणी साचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. शहरातील इतर सखल भागातही पाणी साचले होते. संरक्षक भिंत पडणे, वृक्ष पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे अशा घटना घडल्याचे दिसून आले. तर दरड कोसळून एक जण जखमी झाल्याची घटना घडली. तर दुपार नंतर रेल्वे सेवेवरही काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आले.

ठाणे शहरात शनिवारपासून पाऊस सुरू आहे. त्यानंतर रविवार आणि सोमवारी देखील पावसाने जोरदार बॅटींग केली. त्यानंतर शहरात मागील २८ तासात विक्रमी २८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, दुपारी २.३० वाजेपर्यंत ७५.४२ मीमी पावसाची नोंद झाली.या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. गोकुळनगर, श्रीनगर सोसायटी, आझाद नगर आणि वृंदावन सोसायटी परिसरात या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच, रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्येही पाणी गेल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे श्रीरंग विद्यालयाची सुमारे २०० मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य आणि इतर वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पावसासोबत सोसाट्याचा वारा असल्याने वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी संरक्षक भिंतीचा भाग पडला. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले तर, घोडबंदर भागातील मानपाडा, पातीलपाडा, काजुपाडा, गायमुख या भागात रस्त्यांनाच नदीचे स्वरुप आल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतुकीला मोठा ब्रेक लागला होता. वाहतुक धिम्या गतीने सुरु होती, येथील वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतुक पोलीस तारेवरची कसरत करतांना दिसून आले. तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला.

ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, दातिवली, गणेशपाडा, डायघर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. कोपरी येथील रामभाऊ मार्ग, येऊर येथील कोपरकर बंगल्याजवळील परिसर, येऊर गाव, माजिवाडा येथील साईनाथ नगर, कोर्टनाका येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय परिसर, तहसीलदार कार्यालय परिसर, शीळफाटा रोड, खर्डी दिवा रोड, ठाण्यातील श्रीरंग विद्यालय आणि सोसायटी परिसर, घोडबंदर चेना पुल, वृंदावन परिसर, ठाण्यातील आंबेडकरनगर येथील नाला परिसर, कासारवडवली येथील टायटन रु्गणालयाच्या मागील परिसर, मुंब्रा देवी कॉलनी परिसर याठिकाणी पाणी साचले होते. कोपरी आनंदनगर बुद्ध विहार परिसर, येऊर गावातील रस्त्यावर, भाईंदरपाडा भागात घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.

दुसरीकडे कळवा वखार चाळ येथे वृक्ष पडल्याची घटना घडली. तसेच दिवा फडकेपाडा, नाखवा हायस्कुल समोर, जिजामाता सोसायटी शिवाई नगर, पºयाचे मैदान विटावा, दिवा कल्याण रोड आदी भागातही वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या.

हिरानंदानी इस्टेट जवळील श्री मॉ शाळेची संरक्षक भिंत कोसळली, घोडबंदर येथील पानखंडा गावात एका घराची भिंती कोसळली. यात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. कळवा येथील पारसिकनगर भागातील ओझोन व्हॅली सोसायटीजवळील नाल्याची भिंत कोसळली. मुंब्रा येथील संजयनगरमधील नाशिक वॉर्ड चाळीतील घराची भिंत पडली. या घटनांमध्ये कुणीही जखमी झालेले नाही. लोकमान्यनगर पाडा क्रमांक ४ येथील संतोष पाटील नगरमधील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या घरावर दरड कोसळली. यात जय मातेरे यांच्या घराचे नुकसान झाले असून यात अमरनाथ शर्मा (७०) हे जखमी झाल्याने त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून येथील चार खोल्या रिकाम्या करण्यात आल्या असून येथील नागरिक नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेले आहेत.

Web Title: Thane receives double century of rainfall in 28 hours; 75.42 mm of rainfall recorded till Tuesday afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.