बनावट सोने विकणा-यास ठाण्याच्या मानपाड्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 22:46 IST2019-11-04T22:41:37+5:302019-11-04T22:46:38+5:30
आई आजारी असल्याचा बहाणा करीत बनावट दागिने गहाण ठेवणा-या जगदीश अडसुळे याला नौपाडा पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी मानपाडा भागातून अटक केली.

नौपाडा पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बनावट सोने विकणा-या जगदीश गोरख अडसुळे (२०, रा. आझादनगर, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी सोमवारी पहाटे मानपाडा भागातून अटक केली. त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
सिद्धेश्वर तलावाजवळील सेवारस्त्यावरील कॅडबरी कंपनीसमोर संदेश सांगळे (२४) हे १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घरी होते. तेव्हा आझादनगर येथे राहणा-या अडसुळे याने बनावट सोनसाखळी सांगळे यांच्याकडे आणून दिली. आई आजारी असल्याचा बहाणा करत ही सोनसाखळी त्यांच्याकडे गहाण ठेवून त्यांच्याकडून ४० हजारांची रोकड त्याने घेतली. हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर सांगळे यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, उपनिरीक्षक विनोद लबडे आदींच्या पथकाने ४ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या आझादनगर, मानपाडा भागातून त्याला अटक केली. त्याच्याकडून आणखी फसवणुकीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.