स्मार्ट सिटीच्या बैठकीत ठाणे महापालिकेची नामुष्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 01:04 IST2019-09-07T01:04:35+5:302019-09-07T01:04:38+5:30
लोकप्रतिनिधी आक्रमक : प्रधान सचिवांसमोरच प्रशासनाचे पितळ उघड

स्मार्ट सिटीच्या बैठकीत ठाणे महापालिकेची नामुष्की
ठाणे : ठाणे महापालिकेत प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्षाचे पडसाद शुक्रवारी मंत्रालयातील ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड (टीएससीएल) या कंपनीच्या बैठकीतही उमटले. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती आम्हाला दिली जात नाही, बैठकीचे गोषवारे आणि विषयपत्रिका अवघी एक दिवस आधी दिली जाते, त्यामुळे संचालक असतानाही आम्ही या योजनांबाबत अनभिज्ञ आहोत, असे आक्षेप घेऊन महापौरांसह लोकप्रतिनिधींच्या संचालक मंडळाने प्रशासकीय कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करून ठामपा प्रशासनाला नगरविकासचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासमोर उघडे पाडले.
महापौरांच्या मागणीनुसार बैठकीतल्या विषय पत्रिकेवर कोणतीही चर्चा न करता ही सभा तहकूब करून ठामपा प्रशासनाची चांगलीच नामुष्की केली. ही बैठक सुरू होताच महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे आणि भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पालिकेची सर्वसाधारण सभा नसून आपले वाद येथे नको असे अधिकाऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकप्रतिनिधींनी आपला सूर कायम ठेवला.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कोणत्या योजनेचे किती काम झाले, त्यावर किती खर्च झाला, योजनेची सध्यस्थीती काय आहे याची कोणताही माहिती संचालक या नात्याने आम्हाला दिली जात नसल्याचा आरोप म्हस्के यांनी केला. कुणाला आम्ही अशिक्षित वाटत असलो तरी तुमच्या सोबत आम्हाला बसविता हा तुमचा मोठेपणा आहे, असे मतप्रदर्शन मनुकूमार यांना उद्देशून म्हस्के यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना कोपरखळी मारण्याचा प्रयत्न केला. योजनांबाबत आम्हाला कोणतीही माहिती नसून कामे कुठे सुरू करतात, उद्घाटने होतात हेसुद्धा कळत नाही असा आरोप पवार यांनी केला.
नरेश म्हस्के यांचे नाव वगळले
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रकल्प राबविण्यासाठी ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड (टीएससीएल) या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. राज्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर हे प्रशासकीय अधिकारी कंपनीत सरकारचे प्रतिनिधी आहेत. तर, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समतिी सभापती राम रेपाळे, विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील, भाजपचे गटनेते नारायण पवार आण िकॉग्रेसचे यासिन कुरेशी आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे पालिकेचे प्रतिनिधी आहेत. अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद आहे.
शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीच्या गोषवाºयातून सभागृह नेत्यांचे नावच गायब होते.३१ मार्च रोजीच्या संचालक मंडळातही म्हस्के यांच्या नावाचा समावेश नव्हता. मधले नाव गायब कसे वगळले असे सांगून संतापलेल्या म्हस्के यांनी संबंधित अधिकाºयांना त्याचा जाब विचारला.
मार्च महिन्यांत झालेल्या बैठकीत स्मार्ट सिटी अंतर्गत राबविलेल्या कामांची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश मनुकुमार यांनीच दिले होते. मात्र, आजतागायत ती माहिती मिळालेली नाही. त्यामुळे टीएससीएलचे संचालक असलो तरी आम्हाला त्या योजनांबाबत काहीच माहिती नाही. शुक्र वारी जी सभा होती त्याचे गोषवारे गुरुवारी देण्यात आले. एवढ्याकमी वेळात ते वाचून त्यावरील भूमिका मांडणे अशक्य होते. हे प्रकार सातत्याने होत असून प्रधान सचिवांनी सांगितल्यानंतरही कार्यपद्धती बदलत नसल्याने सभा तहकूबी मांडली होती. प्रशासनाकडून योजनांची सविस्तर माहिती दिली जात नाही तोपर्यंत सभेचे कामकाज करू देणार नाही. - मीनाक्षी शिंदे, महापौर