ठाणे महापालिका डायरी : प्लास्टिक ते सोफासेट सारेच फेकतात नाल्यात!
By संदीप प्रधान | Updated: May 19, 2025 14:19 IST2025-05-19T14:19:27+5:302025-05-19T14:19:27+5:30
नालेसफाईच्या ठेकेदारीत जसा भ्रष्टाचार आहे, तसाच प्लास्टिक पिशव्यांपासून अगदी घरातील खराब झालेले सोफासेट नाल्यात बिनदिक्कत फेकून देणारे आपण सारेच या पावसाळी पुराला जबाबदार आहोत...

ठाणे महापालिका डायरी : प्लास्टिक ते सोफासेट सारेच फेकतात नाल्यात!
संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक -
पावसाळा जवळ येऊन ठेपला की, ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील नालेसफाईची कामे असमाधानकारक झाल्याच्या बातम्या यायला लागतात. प्रत्यक्ष मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर ज्या दिवशी मुसळधार पाऊस होतो तेव्हा रस्त्यांवर पाणी साचून ते झोपडपट्ट्या, बैठ्या वस्त्या, सहकारी सोसायट्यांमध्ये शिरते आणि न झालेल्या नालेसफाईच्या नावे बोटे मोडली जातात. नालेसफाईच्या ठेकेदारीत जसा भ्रष्टाचार आहे, तसाच प्लास्टिक पिशव्यांपासून अगदी घरातील खराब झालेले सोफासेट नाल्यात बिनदिक्कत फेकून देणारे आपण सारेच या पावसाळी पुराला जबाबदार आहोत.
काही वर्षांपूर्वी ठाणे शहरातील एका मोठ्या नाल्यातील कचरा काढण्याकरिता जेसीबी उतरवला असता त्यातून खराब सोफासेट बाहेर काढला गेला. घरात नवीन सोफासेट आणल्यावर जुना सोफासेट नाल्यात फेकून देण्याची शक्कल सुचलेल्या व्यक्तीला साष्टांग दंडवत घातला पाहिजे. आपल्या घरात नकोसे झालेले कुठलेही सामानसुमान लोक मागचा- पुढचा अधिक विचार न करता ते सर्रास नाल्यात भिरकावतात. प्लास्टिक पिशव्या व नष्ट न होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू वापरू नयेत, याकरिता नियम, कायदे केले आहेत; परंतु महापालिकेकडील कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आपण सारेच बाजारात खरेदी करायला जातो तेव्हा कापडी पिशवी घेऊन जायला सोईस्करपणे विसरतो. मग विक्रेता हळूच दडवलेली प्लास्टिक पिशवी देतो. आपण उजळमाथ्याने हा कायदेभंग मिरवत घरी जिन्नस घेऊन येतो. नालेसफाईची कंत्राटे ही नेहमीच स्थानिक स्वराज्य संस्थांना अपेक्षित खर्चापेक्षा २० ते २५ टक्के कमी दराने दिली जातात. म्हणजे एक रुपयाचे काम ७५ पैशांत करायची तयारी कंत्राटदार दाखवतो. महापालिकेच्या अधिकारी, लोकप्रतिनिधींना लक्ष्मीदर्शन घडवल्यावर एक रुपया महापालिकेकडून घेणारा कंत्राटदार प्रत्यक्षात ३५ ते ४० पैशांचे काम करतो. नालेसफाईबाबत अधिकारी वर्गात एक दांडगा आत्मविश्वास आहे की, सुरुवातीला जेव्हा मोठा पाऊस येईल, तेव्हा पाण्यासोबत नाल्यातील कचरा वाहून जाईल. पण तो वाहून गेला नाही आणि एका तासात अनपेक्षितपणे आणखी मोठा पाऊस झाला, तर नालेसफाईची पोलखोल होते.
जिल्ह्यातील नालेसफाईवरील खर्च
ठाणे महापालिका हद्दीत ३८४.९१ किमीचे नाले आहेत. यंदा त्यांच्या सफाईवर १० कोटी २९ लाख खर्च केले जाणार आहेत. कल्याण डोंबिवलीत ९५ मोठे नाले आहेत. त्यांच्या सफाईवर चार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. उल्हासनगरात लहान-मोठ्या नाल्यांची लांबी २८० कि.मी. असून, गाळ काढण्यासाठी एक कोटी ३० लाखांची तरतूद आहे. भिवंडी महापालिका हद्दीतील नाल्यांची लांबी ४४ हजार ५६५ मीटर आहे. त्यांच्या सफाईवर दोन कोटी २७ लाख ९७ हजार रुपये खर्च होणार आहे. अंबरनाथ- बदलापूरमध्ये मोठे नाले २२ कि.मी.चे असून, त्याच्या सफाईवर ४० लाख खर्च केला जाणार आहे.