चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांची आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 16:07 IST2021-05-17T16:06:50+5:302021-05-17T16:07:58+5:30
यावेळी अतिरिक्त आयुक्त - 2 संजय हेरवाडे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम आदी उपस्थित होते.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांची आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश
ठाणे : तौक्ते चक्रीवादळामुळे काल रात्रीपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देवून नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे आदेश देतानाच अतिवृष्टी कालावधीत सर्व यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे आदेश दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त - 2 संजय हेरवाडे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम आदी उपस्थित होते.
भारतीय हवामान खात्याने ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे प्रामुख्याने वेगाने वारे वाहण्यासह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार काल रात्रीपासून शहरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या वादळी पावसाळामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर लहान-मोठे वृक्ष पडल्याची घटना घडली असली तरी, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सतर्कतेने आणि जलद प्रतिसादामुळे सर्व वृक्ष तात्काळ हटवण्यात आले असून संबंधित रस्ते मोकळे कऱण्यात आले आहेत.
अतिवृष्टीच्या या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देवून काल रात्रीपासून कक्षाकडे आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. यावेळी कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत अतिवृष्टी कालावधीत नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे आदेश देतानाच सर्व नाल्यांची साफसफाई करणे, शहरात सखल भागात पाणी साठणार नाही, धोकादायक इमारती तसेच वृक्ष पडून जीवित व वित्तहानी होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.