Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 21:32 IST2025-07-27T21:29:26+5:302025-07-27T21:32:32+5:30
Thane Crime: ठाण्यात एका महिलेने पोटच्या तिन्ही मुलींना विष देऊन ठार केल्याची घटना समोर आली.

Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
मुलींचा पालन पोषणाचा खर्च करणे परवडत नसल्याने एका महिलेने पोटच्या तीन मुलींच्या जेवणात फवारणीचे औषध मिळसून त्यांना ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गु्न्हा दाखल करून तिला अटक केली.ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संध्या संदीप बेरे (वय, २७) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती शहापूर परिसरातील अस्नोली गावातील तळेपाडा भागातील रहिवासी आहे. पोटच्या तिन्ही मुलींना वरण भातातून फवारणीचे औषध देऊन मारल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली.
ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच, आठ आणि १० वर्षांच्या मुलींना जेवल्यानंतर अचानक उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्यांची तब्येत बिघडल्याने त्यापैकी दोघींना मुंबईतील एका रुग्णालयात हलवले, ज्यांचा २४ जुलै आणि २५ जुलै उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, सऱ्या मुलाला नाशिकच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा २४ जुलै रोजी मृत्यू झाला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
याप्रकरणी खिनावली पोलिस ठाण्यात नैसर्गिक मृत्युची नोंद करण्यात आली. पंरतु, शवविच्छेदनाच्या अहवालात मुलींच्या शरिरात विष आढळून आले. या महत्त्वाच्या फॉरेन्सिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी संध्याला रविवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. सुरुवातीला संध्याने पोलिसांना उडवाउडवीचे उत्तर दिली. परंतु, पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने हत्येची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या पतीला दारूचे व्यसन होते. त्यामुळे ती आपल्या मुलीसह वेगळी राहत होती. या महिलेला एकट्याने मुलींचे संगोपन करण्यात अडचण येत असल्याने तिने हा गुन्हा केला, असा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.