Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 06:13 IST2025-11-22T06:11:35+5:302025-11-22T06:13:18+5:30
BJP vs Shinde Sena: बीएसयूपी घरांच्या नोंदणीसाठी फक्त १०० रुपये नोंदणी शुल्क घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावरून भाजप व शिंदेसेना यांच्यात सुरू झालेली श्रेयवादाची लढाई गुरुवारी रात्री अक्षरश: हातघाईवर गेली.

Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: बीएसयूपी घरांच्या नोंदणीसाठी फक्त १०० रुपये नोंदणी शुल्क घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावरून भाजप व शिंदेसेना यांच्यात सुरू झालेली श्रेयवादाची लढाई गुरुवारी रात्री अक्षरश: हातघाईवर गेली. शासन निर्णयाबाबत पेढे वाटायला गेलेल्या शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजप नेत्याने आम्ही घरे बांधून दिली असताना तुम्ही पेढे का वाटताय असे म्हणत मारहाण केली. त्यानंतर शिंदेसेनेने पोलिसांत तक्रार नोंदवली. भाजपने मात्र मारहाण केल्याचा इन्कार केला आहे.
पाचपाखाडी परिसरातील लक्ष्मीनारायण सोसायटीमध्ये बीएसयूपी नोंदणी सवलतीची माहिती रहिवाशांना देण्यासाठी व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यासाठी शिंदेसेनेचे पदाधिकारी गुरुवारी रात्री गेले होते. त्यावेळी भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली ४० कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले. ही घरे आम्ही बांधून दिली असताना तुम्ही येथे येऊन पेढे का वाटताय, असा सवाल पवार यांनी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना केला. त्यातून बाचाबाची झाली.
दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली. शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार भाजपच्या पवार यांनी शिंदेसेनेचे शाखाप्रमुख हरेश महाडिक यांच्या कानाखाली मारली. तसेच उपशाखाप्रमुख महेश लहाने यांनाही धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यामुळे आता ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत पवार यांच्या विरोधात तक्रार नोंदवली.
सर्व प्रकार केवळ बनाव : भाजप
याबाबत भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मारहाणीचा कोणताही प्रकार घडलेला नाही. लक्ष्मीनारायण सोसायटीमधील रहिवाशांनी त्यांच्या समस्येबाबत माझ्याकडे तक्रार केली होती. ती ऐकून घेण्यासाठी मी तिथे गेलो होतो. त्यावेळी तिथे कोणीही शिंदेसेनेचा पदाधिकारी जल्लोष करण्यासाठी उपस्थित नव्हते. तिथे कोणालाही मारहाण झाली नाही. हा सर्व प्रकार केवळ बनाव आहे. तसेच शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जर जल्लोष करायचा होता, तर महायुतीचा नगरसेवक म्हणून मलाही बोलवायचे होते. मी ही त्यांच्या जल्लोषात सामील झालो असतो, अशी पुस्ती त्यांनी जोडली.