घोरपडीची शिकार करणा-यास ठाणे वनविभागाने केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 22:11 IST2019-11-01T22:07:35+5:302019-11-01T22:11:48+5:30
घोरपडीची कत्तल होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची गंभीर दखल घेत ठाणे वनविभागाने सुभाष राठोड (३२, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई) याला ३० आॅक्टोबर रोजी अटक केली. त्याला २ नोव्हेंबरपर्यंत वन विभागाची कोठडी मिळाली आहे.

दगड मारून केली शिकार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोरपडीची शिकार करून कत्तल करणा-या सुभाष देवजी राठोड (३२, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई) याला ठाणे वनविभागाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बेलापूर येथील सेक्टर आठ दुर्गामातानगर येथे घोरपड या वन्य प्राण्याची चाकूने कत्तल होत असल्याची माहिती ठाणे वनविभागाचे वनक्षेत्रपाल मुठे यांना मिळाली होती. तसा व्हिडिओदेखील या त्यांना मिळाला. याच माहितीच्या आधारे ३० आॅक्टोबर रोजी ठाण्याचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक सनसंरक्षक गिरजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेद्र मुठे, ठाणे वन्यजीव विभागाचे वनपाल मनोज परदेशी, वनरक्षक अर्जुन निचिते आणि सचिन सुर्वे आदींच्या पथकाने मिळालेल्या व्हिडीओची खात्री करून पुनर्वसू फाउंडेशनचे सदस्यांच्या मदतीने या मृत घोरपडीचा शोध घेतला. तेंव्हा सीबीडीतील सेक्टर आठ मधून राठोड याला या पथकाने ताब्यात घेतले. ही घोरपड घराजवळील जंगलात आढळल्यानंतर अन्य दोन साथीदारांच्या मदतीने तिला दगड मारला. नंतर चाकू आणि ब्लेडने तिचे मटण खाण्यासाठी कत्तल केल्याची कबुली त्याने वनविभागाच्या या पथकाला दिली. त्याच्याविरुद्ध वन्यप्राणी वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून त्याच्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे. न्यायालयाने राठोड याला २ नोव्हेंबरपर्यंत वनविभागाची कोठडी दिली आहे.