ठाणे एफडीएची धडक कारवाई, लाखो किलो खजूर अन् जिरा जप्त

By अजित मांडके | Published: November 15, 2022 03:00 PM2022-11-15T15:00:13+5:302022-11-15T15:03:34+5:30

एकूण १३ अन्नपदार्थांचे नमुने घेत, ते तपासणी पाठवले आहेत.त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे ठाणे एफडीएने सांगितले.

Thane FDA raid, millions of kilos of dates and cumin seized | ठाणे एफडीएची धडक कारवाई, लाखो किलो खजूर अन् जिरा जप्त

ठाणे एफडीएची धडक कारवाई, लाखो किलो खजूर अन् जिरा जप्त

Next

ठाणे :  गैरछापाचा व कमी प्रतीचा अन्नपदार्थ असल्याच्या संशयासह अस्वच्छ व अनारोग्य वातावरणात साठवलेला लाखो किलो खजूर आणि हजारो किलो जिरा यांसारख्या अन्नपदार्थाचा एक कोटी ७ लाख रुपयांचा साठा ठाणेअन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) जप्त केला आहे. ही कारवाई १४ नोव्हेंबर रोजी नवी मुंबई येथील खैरणे येथे केली असून यावेळी एकूण १३ अन्नपदार्थांचे नमुने घेत, ते तपासणी पाठवले आहेत.त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे ठाणे एफडीएने सांगितले.
         
नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्न पदार्थांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्व सामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अन्नपदार्थांचे उत्पादक, साठवणूकदार तसेच शीतगृहे यांच्या तपासणीची विशेष मोहीम ठाणे एफडीएने हाती घेतली आहे. या करवाईपुर्वी म्हणजे २ नोव्हेंबर २०२२ रोजी नवीमुंबई, तुर्भे येथील एमआयडीसीमधील मेसर्स सावला फूड अँड कोल्ड स्टोरेज प्रायव्हेट लिमिटेड, व मेसर्स सावला फुड्स अँड कोल्ड स्टोरेज प्रायव्हेट लिमिटेड,या ठिकाणी असलेल्या शीतगृहाची तपासणी करून रुपये २९ कोटी ६७ लाख ७१ हजार ११० किमतीचा विविध अन्नपदार्थाचा साठा केला. दरम्यान तेथे शीतगृहात आढळून आलेल्या त्रुटी इतर शीतगृहात राहू नयेत किंवा आढळून येऊ नयेत म्हणून कोकण विभागातील ८७ शीतगृहांना ८ नोव्हेंबर २०२२ रोजी नोटीस पाठवून त्यांना अन्नपदार्थाचे साठवणूक करताना नक्की काय खबरदारी घ्यावी याबाबत स्पष्टपणे सूचना केल्या होत्या. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी नवीमुंबई, खैरणे, एमआयडीसी येथील मेसर्स पी.एम. कोल्ड स्टोरेज येथे शीतगृहाची तपासणी केली असता, येथील शीतगृहातून १ लाख ३४ हजार ७३३ किलो विविध प्रकारचे खजूर तसेच २ हजार ८४८ किलो जीर असा एकूण १ कोटी ०७ लाख ०३ हजार २५० किमतीचा अन्नपदार्थाचा साठा हा गैरछापाचा व कमी प्रतीचा असल्याचा संशयासह अस्वच्छ व अनारोग्य वातावरणात अशापद्धतीने साठवलेला असल्याने समोर आले. त्याच्यानंतर तो साठा जप्त करण्यात आला. यावेळी त्या अन्न आस्थापनातून एकूण १३ अन्नपदार्थांचे नमुने अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत शासकीय विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या असून त्यांचा अहवाल आल्यानंतर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे एफडीएने सांगितले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे कोकण विभाग, सह आयुक्त ( अन्न) सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अन्न सुरक्षा अधिकारी राहुल ताकाटे, राम मुंडे, अरविंद खडके, प्रशांत पवार व दीप्ती राजे हरदास यांनी केली. 
        
दरम्यान, नागरिकांना सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्यासह अन्नविषबाधे सारखी अप्रिय घटना घडू नये तसेच शीतगृहात अन्नपदार्थाची योग्य प्रकारे आरोग्यदायी वातावरणात साठवणूक होते किंवा कसे यासह त्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसी ते नमूद बाबीसह त्यांच्याकडून अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ व त्यानंतर या अंतर्गत जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून तरतुदींचे पालन होते किंवा कसे याची पाहणी व तपासणी करण्याकरता प्रशासनामार्फत अशा प्रकारच्या कारवाई यापुढे नियमितपणे घेण्यात येणार असल्याचे एफडीएचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Thane FDA raid, millions of kilos of dates and cumin seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.