Kalyan News: कल्याण पूर्वमधील एका चार मजली इमारतीमध्ये भयंकर दुर्घटना घडली. यात चार जणांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी चार मजली इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील छत कोसळले. यात काही लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कल्याण पूर्वमधील करपेवाडी भागात चिकणीपाडा परिसरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी कल्याण डोंबिवली महापालिका आणि अग्निशामक दलाला घटनेची दुर्घटनेबद्दल कळवण्यात आले.
दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला
अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब तळमजल्यावर कोसळला होता. स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली काही लोक दबले गेले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. यात चार जणांना ढिगाऱ्याखाली जखमी अवस्थेत काढण्यात आले.
दुर्घटनेत चौघांचा मृत्यू
सप्तश्रृंगी असे दुर्घटना घडलेल्या इमारतीचे नाव आहे. स्लॅब खाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत असताना चार जणांचा मृत्य झाला असल्याचे समोर आले. मृतांमध्ये तीन महिलांसह एका दीड वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश आहे.
वाचा >>खासगी इमारतींचे परिरक्षण बंधनकारक; धोकादायक इमारतींचा प्रश्न
दरम्यान, या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू असून, कुणी दबले गेले आहे का, हेही बघितले जात आहे.
सप्तश्रृंगी धोकायदायक इमारतींच्या यादीत
टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, दुर्घटना घडलेली सप्तश्रृंगी इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत आहे. तसे महापालिकेकडून जाहीर केलेले असून, नोटीसही बजावण्यात आलेली होती. नागरिकांना मान्सून पूर्वी इमारत रिकामी करण्यास सांगण्यात आलेले होते.