ठाण्यातील बिल्डर दाम्पत्याने सदनिका विक्रीच्या नावाखाली केली ५० लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 19:54 IST2018-01-31T19:44:10+5:302018-01-31T19:54:51+5:30
एकच सदनिका अनेकांना विकून त्यापोटी लाखो रुपये उकळण-या कथित बिल्डर दाम्पत्यांविरुद्ध ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एकच सदनिका अनेकांना विकल्याचा देखावा
ठाणे: सदनिका विक्रीच्या नावाखाली भिवंडीच्या काल्हेर येथील अनिलकुमार सिंग (४८) यांना बिरेंद्र पुजारा आणि तुलसी पुजारा या दोघांची ३९ लाख २५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार कापूरबावडी भागात घडला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिलकुमार आणि त्यांच्या भावाला भिवंडीतील गोवेगाव येथील ‘तुळशीधाम’ या इमारतीमध्ये एक सी ००८, १०१, १०४ आणि २०८ या क्रमांकाच्या तीन सदनिका देतो अशी पुजारा यांनी बतावणी केली होती. त्यांचा हा सौदा ३९ लाख २५ हजारांमध्ये ठरला होता. त्यातील दहा लाख ७५ हजारांची रोकड अनिलकुमार यांनी कापूरबावडीतील लेक सिटी मॉल येथील दुसºया मजल्यावरील एका गाळयामध्ये दिली होती. तर उर्वरित रक्कम ३९ लाख २५ हजार रुपये धनादेशाद्वारे बँकेतून घेऊन विरेंद्र आणि तुलसी यांनी अनिलकुमार यांनी खरेदी केलेल्या वरील चारही सदनिका त्यांना न देता त्यांची आपसात संगनमत करुन बनावट कागदपत्रे तयार केली. नंतर या चारही सदनिका इतर व्यक्तींना विकल्या. त्यांच्याकडूनही पैसे घेऊन त्यांनाही या सदनिका न देता त्यांचीही फसवणूक केली. हा प्रकार ३० जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१७ या दोन वर्षांच्या काळात घडला. अशा प्रकारे एकाच फ्लॅटवर अनेकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी पुजारा यांच्याविरुद्ध अनिलकुमार यांनी ३० जानेवारी २०१८ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्यामुळे कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक एन. बी. गिरासे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.