सभ्यतेच्या बुरख्यातील ‘दहशती’ डॉक्टर; दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप; एटीएसच्या कारवाईनंतर बदलापूर शहर रडारावर

By पंकज पाटील | Updated: August 7, 2025 13:13 IST2025-08-07T13:13:11+5:302025-08-07T13:13:43+5:30

उत्तर प्रदेशच्या एटीएसने कारवाई करून या डॉक्टराला ताब्यात घेतल्यामुळे बदलापूर शहर चर्चेत आले आहे.

terror doctor in the guise of civility; Alleged links with terrorists; Badlapur city on radar after ATS action | सभ्यतेच्या बुरख्यातील ‘दहशती’ डॉक्टर; दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप; एटीएसच्या कारवाईनंतर बदलापूर शहर रडारावर

सभ्यतेच्या बुरख्यातील ‘दहशती’ डॉक्टर; दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप; एटीएसच्या कारवाईनंतर बदलापूर शहर रडारावर

पंकज पाटील

बदलापूर : रुग्णालयातील चांगली वागणूक... रुग्णांसोबत सेवाभावी वृत्ती... उच्चशिक्षण घेऊन अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न बाळगणारा बदलापूरचाडॉक्टर दहशतवादी संघटनेच्या संपर्कात कसा आला, याचा शोध आता सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएसने कारवाई करून या डॉक्टराला ताब्यात घेतल्यामुळे बदलापूर शहर चर्चेत आले आहे.


बदलापूर शहरातून उत्तर प्रदेश एटीएसने डॉक्टर ओसामा शेख याला ताब्यात घेतले. शेख हा डॉक्टर पूर्वेकडील एका रुग्णालयात होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून कार्यरत होता. रुग्णालयातील त्याची वागणूक शांत आणि संयमी होती आणि रुग्णांप्रति त्याची आस्था विलक्षण होती. असे असले, तरी प्रत्यक्षात त्याची कृती हे उत्तर प्रदेश एटीएसला खटकली.

असा झाला डाॅक्टरचा सहभाग उघड
उत्तर प्रदेश एटीएसकडून देशविघातक कृत्यांवर नजर ठेवली जात होती. यामध्ये ४०० सदस्य असलेल्या का पाकिस्तानी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये उत्तर प्रदेशातला एक मोबाइल नंबर समाविष्ट असल्याची माहिती मिळाली होती. हा नंबर वापरणाऱ्या अजमल अली याला उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपण पाकिस्तानी व्यक्तींच्या संपर्कात असल्याची कबुली दिली.  अजमल अली याने आपण इंस्टाग्रामवर एका व्यक्तीला आपला गुरू आणि मेंटॉर मानत असल्याचे त्याने सांगितले. अजमल अली याचा हा गुरू म्हणजेच बदलापूरचा डॉ.ओसामा शेख असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली.

ग्रामस्थ दहशतीखाली
बदलापूर गावात राहणारा डॉ.ओसामा याला चार बहिणी असून, त्याच्यावर घराची जबाबदारी होती. तो दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची जाणीवही गावातील नागरिकांना नव्हती. तो ज्या बदलापूर गावात राहत होता, ते गावही धार्मिक वादामुळे नेहमी रडारवर राहिले आहे. त्यामुळे गावातील एका डॉक्टरावर कारवाई झाल्याने ग्रामस्थ दहशतीच्या छायेखाली आहेत.

देशविरोधी कारवायांना प्रोत्साहनाचा संशय
ओसामा हा अजमल अली याच्याप्रमाणे अनेकांशी इंस्टाग्राम आणि सिग्नल ॲपद्वारे संपर्कात राहून देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन देत होता, असा संशय उत्तर प्रदेश एटीएसला असून, त्याच चौकशीसाठी त्याला अटक केली आहे. भारतातील सरकार पाडून शरिया कायदा लागू करण्याच्या चर्चाही केल्या जात होत्या, कट्टर धार्मिक विषयांवर हा डॉक्टर अप्रत्यक्ष सहभागी होत असल्याचा आरोपही होत आहे.


 

Web Title: terror doctor in the guise of civility; Alleged links with terrorists; Badlapur city on radar after ATS action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.