Tauktae Cyclone : नौदलाच्या हॅलिकॉप्टरचे भाईंदरच्या समुद्र किनारी इमर्जन्सी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 20:01 IST2021-05-18T19:56:27+5:302021-05-18T20:01:07+5:30
Tauktae Cyclone : हॅलिकॉप्टर उतरल्याचे कळताच मच्छीमारांनी ते पाहण्यासाठी किनाऱ्यावर गर्दी केली.

Tauktae Cyclone : नौदलाच्या हॅलिकॉप्टरचे भाईंदरच्या समुद्र किनारी इमर्जन्सी लँडिंग
मीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे मंगळवारी सुद्धा वारा व पाऊस जोरात असताना नौदलाच्या एका टेहळणी हॅलिकॉप्टरचं वादळी वाऱ्यांमुळे वैमानिकास भाईंदरच्या पाली येथील जेट्टीवर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. हॅलिकॉप्टर उतरल्याचे कळताच मच्छीमारांनी ते पाहण्यासाठी किनाऱ्यावर गर्दी केली. मंगळवारी सकाळी नौदलाचे टेहळणी हॅलिकॉप्टर भाईंदर जवळील उत्तन भागात घिरट्या घालत पाली गावातील समुद्र किनाऱ्यावर असलेल्या जेट्टीवर अचानक उतरले.
जेट्टीवर हॅलिकॉप्टर उतरल्याचा अनपेक्षित प्रकार कोळीवाड्यात समजताच लहान - मोठ्यांनी सर्वानीच हॅलिकॉप्टर पाहण्यासाठी किनाऱ्यावर गर्दी केली. बहुतेकांना तर समुद्रात अडकलेल्या मच्छीमार बोटीतील मच्छीमारांची सुटका करण्यासाठी आले असल्याचा समज झाला. जवळपास २० मिनिटे जेट्टीवर थांबलेले हॅलिकॉप्टर नंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले. चक्रीवादळामुळे झालेल्या परिणामांची पाहणी करण्यासाठी हे हॅलिकॉप्टर फिरत होते. परंतु वादळामुळे वातावरण ढगाळ होऊन जोरदार वारा - पाऊस असल्याने वैमानिकाने हॅलिकॉप्टर जेट्टीवर उतरवल्याचे सांगण्यात आले.