उपवनच्या तळयाकाठी स्वत्वने रंगविले २५० ठाणेकरांचे चेहरे, पर्यावरणपूरक होळीसाठी अनोखा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 20:22 IST2022-03-18T20:21:48+5:302022-03-18T20:22:12+5:30
होळी तसेच धुळवडीच्या निमित्ताने होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी स्वत्व या संस्थेने तीन वर्षापूर्वी सुरु केलेला अनोखा उपक्रम यंदाही उपवन तलावाच्या काठावर राबविला.

उपवनच्या तळयाकाठी स्वत्वने रंगविले २५० ठाणेकरांचे चेहरे, पर्यावरणपूरक होळीसाठी अनोखा उपक्रम
ठाणे:
होळी तसेच धुळवडीच्या निमित्ताने होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी स्वत्व या संस्थेने तीन वर्षापूर्वी सुरु केलेला अनोखा उपक्रम यंदाही उपवन तलावाच्या काठावर राबविला. कलात्मकरित्या तब्बल २५० चेहरे रंगवून त्यांनी जीवन संवर्धन फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला मदतीचा हातही शुक्रवारी दिला. तीन वर्षांपूर्वी स्वत्व ने पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याच्या दृष्टीने हा अनोखा उपक्रम सुरू केला. होळीला पाण्यात तासन तास भिजून होणारा पाण्याचा अपव्यय तसेच नुसतेच कसेही रंग लावून नुसतेच विद्रुप दिसणारे चेहेरे, यावर पर्याय म्हणून ‘कलात्मक चेहेरे रंगविणे’ ही संकल्पना स्वत्व च्या कलाकारांनी मूर्त स्वरुपात आणली.
२०१९ ला प्रथम छोट्या प्रमाणात हा प्रयोग झाला. त्यानंतर २०२० मध्ये उपवन तळ्याकाठी येतील त्या सर्वांचे चेहरे स्वत्वचे कलाकार वेगवेगळ्या सुंदर चित्रंनी रंगवून देत होते. असे २०० च्या वर लोकांचे चेहरे रंगविले. कोरोना काळात त्यांनी ऑनलाईन होळीचा उपक्रम राबविला. यंदा तीन उपक्रम हे स्वत्व आणि डिजीटाऊन ठाणे यांच्यातर्फे ऑनलाईन सहभागाचे तर चेहरे रंगवा उपक्रम धुळवडीच्या दिवशी प्रत्यक्ष पद्धतीने साजरा झाला. यावेळी २५ कलाकारांनी ड्रम वादन केले. तर २० कलाकारांनी कलात्मकरित्या चेहरे रंगविण्याचा उपक्रम राबविला.
ऑनलाइन पद्धतीने होळी साजरी करतानाच १८ मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून स्वत्व च्या कलाकारांनी उपवन तलावाच्या जेट्टीवर नागरिकांचे चेहेरे सुंदर कलात्मक पद्धतीने रंगवून दिले. चेहरे रंगविण्यासाठी स्वत्वने कोणतेही शुल्क आकारणी केली नाही. मात्र ठाण्यातील जीवन संवर्धन फौंडेशन या गरीब, अनाथ विद्याथ्र्याच्या निवास व शिक्षणासाठी काम करणा:या संस्थेच्या मदतीसाठी एक काउंटर याठिकाणी ठेवला होता. पर्यावरण पूरक होळी खेळतानाच एक सामाजिक भान जपूया, असे आवाहन स्वत्व चे श्रीपाद भालेराव यांनी केले होते. त्याला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.
''आपण या शहराचे काही तरी देणे लागतो. या भावनेतून एका संस्थेला मदतीसाठी हा उपक्रम राबविला. तसेच रंगाचा बेरंग करुन पाण्याच्या अपव्ययाबरोबर बिभत्स चेहरे असण्यापेक्षा कलात्मकरितया २० कलाकारांनी २५० चेहरे रंगविले. यातून नऊ हजारांची देणगी जीवन संवर्धन फाऊंडेशनला नागरिकांनी उत्स्फूर्तपणो दिली.''
- श्रीपाद भालेराव, सहसंस्थापक, स्वत्व, ठाणे