सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या मातोश्रींचे निधन
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 22, 2025 16:41 IST2025-05-22T16:39:24+5:302025-05-22T16:41:44+5:30
Justice Abhay Oak mother passes away: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या मातोश्री वासंती ओक यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या मातोश्रींचे निधन
प्रज्ञा म्हात्रे, ठाणे:सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या मातोश्री वासंती ओक यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८८ वर्षांच्या होत्या. त्यांप्रकृती अस्वस्थामुळे वासंती यांच्यावर ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात गेल्या दोन तीन दिवसांपासून उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात न्या. अभय ओक आणि दंत शस्त्रक्रियाकार अजित ओक ही या दोन मुलांसह सूना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. आज त्यांच्या पार्थिवावर जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुरुवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे ,ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे , ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी , आजी माजी न्यायमूर्ती, काही विधिज्ञ यांच्यासह अन्य मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या निधनाने मान्यवरांनी शोक व्यक्त केले. वासंती यांचे खणखणीत बोलणे आणि तसेच वागणे होतेच. आत्मविश्वास आणि स्वावलंबन ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. वागण्यातील काटेकोरपणा कोणालाही थक्क करणारा होता. स्वच्छता हा तर त्यांचा जणू अलंकार होता. त्यांना गणपतीची विविध भावमुद्रेतील, आसनातली तसेच अन्य पेंटींग्ज काढण्याची प्रचंड हौस होती. त्या उत्कृष्ट चित्रकार होत्या, वाचनाचा त्यांना प्रचंड व्यासंग होता. वासंती यांनी लिहिलेली आत्मवृत्तपर काही आठवणी वाचण्याचे भाग्य कित्येकांना लाभले. विविध व्याधींशी त्या टक्कर देत होत्या, त्यातही त्यांचा धीरोदात्त स्वभाव चकित करणाराच आहे. प्रचंड जिद्द, सहनशीलता,संवेदनशीलता, संयम ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती.