पोलीस चौक्यांमध्ये ठेवले अडगळीचे सामान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:28 IST2019-11-06T00:28:39+5:302019-11-06T00:28:58+5:30
वाहतुकीस ठरतोय अडथळा : प्रशासनाकडून कार्यवाही नाही, ज्येष्ठ नागरिकाकडून पाठपुरावा सुरू

पोलीस चौक्यांमध्ये ठेवले अडगळीचे सामान
ठाणे : ऐन गर्दीच्या वेळी ठिकठिकाणच्या रस्त्यांवरील वाहतूक पोलिस चौक्यांचा वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करीत असल्याचे वास्तव येथील राम मारूती मार्ग तसेच स्टेशनजवळील अलोक हॉटेल परिसरातील वाहतूक पोलीस चौक्यांवरून उघड होत आहे. या चौक्यांचा वापर अडगळीतील सामान ठेवण्यासाठी होत असल्यामुळे त्या वेळीच हटवण्याची मागणी नौपा्यातील ज्येष्ठ नागरिक महेंद्र मोने यांनी वाहतूक पोलीस उप आयुक्त अमित काळे यांच्याकडे लावून धरली आहे.
येथील राम मारूती रोड, अलोक हॉटेल परिसरासह अन्यही ठिकाणी वाहतूक पोलीस चौक्या उभ्या केल्या आहेत. मात्र, त्यांचा वापर आजपर्यंतही वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केला नसल्याचे वास्तव मोने यांनी उप आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले आहे. या चौक्यांचा वापर वाहतूक शाखेकडून झालेला आढळून आलेले नाही. यामुळे या रस्त्यावर चौक्यांचे प्रयोजन काय? या बद्दल खुलासा करावा अन्यथा ठाण्यातील सर्व वाहतूक पोलीस चौक्या ताबडतोब अन्यत्र हलविण्यात याव्यात. गर्दीच्यावेळी त्या वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले. मात्र त्यावर अद्यापही कारवाई झालेल नसल्याची खंत व्यक्त करून मोने यांनी प्रशासनास चांगलेच धारेवर धरले आहे.
या चौक्या हटवण्याविषयीच्या आॅगस्टमधील पत्रास अनुसरून मोने यांना ‘वापरात नसलेल्या वाहतूक पोलिसांच्या चौक्या लवकरात लवकर हटविणे बाबत योग्य ती कार्यवाही वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणार आहे’ असे सप्टेंबरमध्ये वाहतूक शाखेकडून आलेल्या पत्रात स्पष्ट केले. मात्र, आजमितीस त्यास बरोबर एक महिना होत आहे. पण कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. उलटपक्षी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे मोने यांनी निदर्शनास आणून दिले आहे. मध्यंतरीच्या काळात काही राजकीय पक्षांनी सदर चौक्यांचा वापर चक्क आपल्या नेत्यांचे फलक लावण्यसाठी केला. तक्रार केल्यावर ते फलक केवळ हटविण्यात आले, पण संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.