प्रदर्शनातून उलगडली विज्ञानाची अजब दुनिया; ठाणे, नवी मुंबईमधील ११ शाळांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:57 IST2020-02-06T00:56:34+5:302020-02-06T00:57:01+5:30
२३० प्रकल्पांचे सादरीकरण, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रदर्शनातून उलगडली विज्ञानाची अजब दुनिया; ठाणे, नवी मुंबईमधील ११ शाळांचा सहभाग
ठाणे : सेंद्रिय शेती, घरातील कचरा साफ करण्याचे यंत्र, बॉयोगॅस प्रकल्प, फुफ्फुसांची कार्यक्षमता मोजण्याचे यंत्र असे अनेक प्रयोग असलेल्या विज्ञानाची दुनिया बुधवारी ठाणेकरांना अनुभवायला मिळाली. सावरकरनगर येथील आर.जे. ठाकूर विद्यालय, आर्च डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि कोव्हेंस्ट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने युरेका सायन्स फेअर २०२० चे आयोजन ठाणे येथील भारतरत्न इंदिरा गांधी स्कूल येथे करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन कोव्हेंस्ट्रोचे व्यवस्थापकीय संचालक आनंद श्रीनिवासन यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनामध्ये ठाणे, नवी मुंबईतील ११ शाळांच्या विद्यार्थ्यांनी २३० विज्ञान प्रकल्प सादर केले. यावेळी श्रीनिवासन म्हणाले की, विज्ञान जगतात भारताने उत्तुंग शिखर गाठलेले आहे. विद्यार्थी जीवनापासून विज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी व यातून भविष्यात याच विद्यार्थ्यांनी भारताच्या विकासात हातभार लावावा. कृषीभूषण पुरस्कारविजेते राजेंद्र भट्ट यांनी शालेय जीवनातील आपल्या आठवणींना उजाळा दिला.
ते म्हणाले की, आमच्या काळात विज्ञानाने इतकी प्रगती केली नव्हती. आताच्या विद्यार्थ्यांना सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. नव्यानव्या कल्पना विद्यार्थी करू शकतात.विज्ञानाने केलेली प्रगती आणि यात तरूण, शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग हा देशपातळीवर दिवसेंदिवस वाढत आहे. या उद्देशाने सदर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले, हे खूप कौतुकाचे आहे.
या प्रदर्शनात सेंद्रिय शेतीची आवश्यकता व ती करण्याची पद्धती या विज्ञान प्रकल्पाचे मान्यवरांनी कौतुक केले. प्रदर्शनाच्या दुसऱ्या सत्रात पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी आर्च फाउंडेशनचे अध्यक्ष निशांत शाह तसेच ठाणे, नवी मुंबईतील सहभागी शाळांमधील प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते.