उल्हासनगर महापालिकेचा अजब कारभार; सहाय्यक संचालक नगररचनाकाराच्या नियुक्तीनंतर ४ दिवसांत सेवानिवृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:40 IST2025-07-01T17:40:40+5:302025-07-01T17:40:40+5:30
महापालिका अधिकाऱ्याच्या नियुक्ती बाबत चर्चेला उधाण आले.

उल्हासनगर महापालिकेचा अजब कारभार; सहाय्यक संचालक नगररचनाकाराच्या नियुक्तीनंतर ४ दिवसांत सेवानिवृती
उल्हासनगर : महापालिका सहाय्यक संचालक नगररचनाकार ललित खोब्रागडे यांची बदलीनंतर अजय साबळे यांची नियुक्ती झाली. विभागाची तोंड ओळख होण्यापूर्वीच साबळे यांची बदली होऊन राजेंद्र हेले यांची नियुक्ती झाली. मात्र चार दिवसात हेले हे सेवानिवृत्त झाल्याने, महापालिका अधिकाऱ्याच्या नियुक्ती बाबत चर्चेला उधाण आले.
उल्हासनगर महापालिकेत वर्ग-१ व २ ची ७० टक्के पदे रिक्त असून वर्षानुवर्ष शहर अभियंता व कार्यकारी अभियंता पदे रिक्त आहेत. त्यामुळे हजारो कोटीच्या विकास कामावर प्रश्नचिन्हे निर्माण झाले. तर दुसरीकडे सर्वाधिक वादातील नगररचनाकार विभाग पुन्हा चर्चेत आला. जुन महिन्यात सहाय्यक संचालक नगररचनाकार ललित खोब्रागडे यांची बदली होऊन अजय साबळे यांची सहाय्यक संचालक नगररचनाकार पदी नियुक्ती झाली. विभागाची तोंड ओळख होण्यापूर्वी साबळे यांची बदली होऊन, त्यांच्या जागी राजेंद्र हेले यांची नियुक्ती झाली. मात्र चार दिवसात हेले हे ३० जुन रोजी सेवानिवृत्त झाले. १ जुलै पासून सहाय्यक संचालक नगररचनाकर पद रिक्त झाले. चार दिवसात सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती शासनाने कशी केली? असा प्रश्न राजकीय नेत्यांसह नागरिकांनी केला.
महापालिका सहाय्यक संचालक नगररचनाकार राजेंद्र हेले यांच्या सेवानिवृत्ती व नियुक्ती बाबत मुख्यालय उपायुक्त दीपाली चौगुले यांना विचारले असता, त्यांनी हेले यांच्या नियुक्तीचे पत्र टपालीद्वारे सोमवारी मिळाल्याचे सांगितले. तसेच ते ३० जुन रोजी सेवानिवृत्त झाल्याची माहिती दिली. अजय साबळे यांची बदली झाल्यानंतर, फक्त चार दिवसासाठी हेले यांची नियुक्ती झाली का? राजेंद्र हेले यांच्या सेवानिवृत्तीनंतर सहाय्यक संचालक नगररचनाकार पदी कोण? असा प्रश्न विचारला जातो. शासन व महापालिका कारभाराबाबत शहरांत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. अनाधिकृत बांधकामे नियमित करणे, धोकादायक इमारतीची पुनरबांधणी, ऑनलाईन बांधकाम परवानगी आदी कामे धूळ खात पडल्याने, महापालिका कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.