State Excise Department: Forged foreign liquor stocks seized by flying squad | राज्य उत्पादन शुल्क विभाग: भरारी पथकाच्या धाडीत भिवंडीत बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त
दोन कारमधून सुरु होती बनावट विदेशी मद्याची तस्करी

ठळक मुद्दे कोकण विभागाची कारवाईदोन कारमधून सुरु होती बनावट विदेशी मद्याची तस्करीएक लाख ५१ हजारांचा मद्यसाठा हस्तगत

ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने भिवंडीतील कोशिंबी येथे टाकलेल्या धाडीत बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणा-या वाहनांसह ११ लाख ५१ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल बुधवारी जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, कोकण विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण तसेच अंमलबजावणी व दक्षता विभागाच्या संचालक उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक सुधीर पोफळे, दुय्यम निरीक्षक अनिल राठोड आणि ए.बी. पाटील तसेच जवान राजेंद्र शिर्के, दीपक घावटे, अविनाश जाधव आणि जगन्नाथ आजगावकर आदींच्या पथकाने १८ सप्टेंबर रोजी भिवंडीतील कोशिंबीतील वालकस रोड येथे बेकायदेशीरपणे मद्य वाहतूक करणाºया वाहनांची तपासणी केली. त्यावेळी दोन संशयास्पद वाहनांतून एक लाख ५१ हजारांचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला. यामध्ये प्रदीप बामणे (रा. पडघा, भिवंडी, ठाणे) आणि मनोहर पष्टे (रा. बेहरेगाव, खडवली, ता. कल्याण, जि. ठाणे) या दोन वाहनचालकांना त्यांच्या वाहनांसह ताब्यात घेण्यात आले. या वाहनांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची बनावट विदेशी मद्य असलेल्या १८० मिलीच्या एक हजार आठ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. त्यांनी हे मद्य कोणाकडून आणले, ते त्याची कोणाला विक्री करणार होते, या सर्व बाबींची चौकशी करण्यात येत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.


Web Title: State Excise Department: Forged foreign liquor stocks seized by flying squad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.