"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 08:00 IST2025-10-26T07:51:20+5:302025-10-26T08:00:25+5:30
बाहेरून येऊन हे लोक शहरातील वातावरण बिघडवत आहेत, असेही प्रताप सरनाईक म्हणाले.

"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
मीरा रोड : महापालिका निवडणुका जवळ आल्याने जाणीवपूर्वक काही नेते बाहेरून येथे येतात आणि काहीही बोलून जातात. त्यामुळे या नेत्यांना आवरा. मी आणि नरेंद्र मेहता आम्ही दोन्ही महायुतीतील आमदार मिळून शहर सांभाळतो, असे परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
भाजपचे नेते काहीही बोलून जातात. एमआयएमचे नेते आले. याआधी जे. पी. संकुलप्रकरणी मंत्री नितेश राणे आले आणि काहीही बोलून गेले. सपाचे अबू आझमी येणार होते, त्यावेळी आपण त्यांना कॉल करून येऊ नका म्हणून सांगितले. याबाबत मुख्यमंत्र्यांनाही सांगणार आहे की, बाहेरून येऊन हे लोक शहरातील वातावरण बिघडवत आहेत. मीरा-भाईंदरच्या नागरिकांना शांतता हवी आहे. मी आणि नरेंद्र मेहता असे महायुतीचे दोन्ही आमदार शहर सांभाळतोय. बाहेरच्यांनी वातावरण बिघडवण्याची गरज नाही. यापुढे कोणी आल्यास आम्हीही त्यांच्या भागात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.