भिवंडी दुर्घटनेत काही कुटुंबे झाली नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:50 PM2020-09-22T23:50:48+5:302020-09-22T23:51:20+5:30

शेख कुटुंबातील सहा जण दगावले : शोकाकुल नातलग, जवळच्या व्यक्तींना शोधणाऱ्या नजरा अन् वाचलेल्यांनी सोडले सुटकेचे नि:श्वास

Some families became extinct in the Bhiwandi tragedy | भिवंडी दुर्घटनेत काही कुटुंबे झाली नामशेष

भिवंडी दुर्घटनेत काही कुटुंबे झाली नामशेष

googlenewsNext

नितीन पंडित।
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : युसूफ मेहबूबसहाब शेख (५७) हे मंगळवारी पहाटे भिवंडीत दाखल झाले तेव्हा आपली दोन कर्तीसवरती मुले, सून आणि तीन लहानगी नातवंडे जिलानी इमारतीच्या ढिगाºयाखाली दबल्याचे समजताच त्यांच्या पायातील उरलेसुरले त्राण गमावले... त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा पाझरत होत्या... एकेक मृतदेह बाहेर काढल्यावर युसूफ हे कावºयाबावºया नजरेनी पाहत... मुलगा आरिफ व सून नसीमा यांचा मृतदेह बाहेर काढल्यावर युसूफ एखाद्या लहान मुलासारखे धाय मोकलून रडू लागले... ते दृश्य पाहून आजूबाजूचे सारेच हेलावले.


सोमवारची रात्र या इमारतीत राहणाºया शेख कुटुंबीयांसाठी ‘काळरात्र’ ठरली. शेख परिवारातील युसूफ यांचा थोरला पुत्र आरीफ, त्याची पत्नी नसीमा, त्यांची तीन लहान मुले निदा (१०), सादिया (८), हसनैन (३) आणि आरीफचा धाकटा भाऊ सोहेल (२१) या सहा जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिवारावर काळाने घाला घातला आहे. दोन कर्ती मुले गमावल्याने आपला आधार हरपल्याचे युसूफ सांगत होते. बोलताना त्यांचा कंठ दाटून येत होता. आता कुणाच्या भरवशावर जगायचे, असा प्रश्न त्यांनी केला. युसूफ शेख हे मूळचे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हाळी या गावचे. शेतमजूर असलेल्या युसूफ यांना भिवंडीतील दुर्घटनेची खबर मिळाल्यावर येथे येण्याकरिता आजूबाजूच्या रहिवाशांनी व नातलगांनी वाहन करून दिले. पत्नी व लहान मुलगा सोहेल यांच्यासोबत ते राहत होते. सोहेल याने बीएची परीक्षा दिली. एक महिन्यांपूर्वीच सोहेल हा भिवंडीतील मोठा भाऊ आरीफ याच्या घरी राहायला आला. ३ आॅक्टोबरला एका परीक्षेसाठी सोहेल पुन्हा गावाला जाणार होता. मात्र या इमारत दुर्घटनेत त्याचाही मृत्यू झाला. युसूफ यांचा मोठा मुलगा आरिफ शेख (३५) हा २००१ साली बहिणीच्या लग्नानंतर भिवंडीत वास्तव्याला आला. वाहन चालक असलेल्या आरिफचा १२ वर्षांपूर्वी नसीमा हिच्यासोबत निकाह झाला. त्यांना दोन मुली व एक मुलगा होता. परिवारासह एक वर्षापूर्वीच आरिफ दुर्घटनाग्रस्त जिलानी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहायला आला होता. इमारत धोकादायक असल्याने आरिफ दुसरीकडे घर शोधत होता. मात्र त्यापूर्वीच सोमवारी झालेल्या दुर्घटनेत आरिफचा संपूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला. शेख कुटुंबातील चार जणांचे मृतदेह मंगळवारी दिवसभर हाती लागले नव्हते. त्यामुळे युसूफ हे दिवसभर वाट पाहत होते.
सोहेल मला रोज फोन करून माझी विचारपूस करत असे. बाबा माझी काळजी करू नका, आईकडे लक्ष द्या, असे सोहेल याने मला रविवारी रात्री नऊ वाजता फोनवर सांगितले. त्या वेळी आरिफसह नातवंडांशीही माझे बोलणे झाले. त्या वेळी माझे हे माझ्या मुला-नातवंडांसोबत अखेरचे बोलणे असेल, असे वाटले नाही, असे सांगत युसूफ यांना रडू कोसळले. माझ्या पत्नीला आता गावी जाऊन मी काय सांगू, असा करुण सवाल त्यांनी केला.


मागच्या आठवड्यात छोट्या बहिणीची प्रकृती बरी नसल्याने तिला पाहायला उदगीरला गेले होते. रविवारी उदगीर येथून भिवंडीत येण्यासाठी निघालो होतो. मात्र भिवंडीत पाऊल ठेवताच दुर्दैवी घटना पाहायला मिळेल याचा विचार स्वप्नातही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया मृत आरिफ शेख याची मोठी बहीण परवीन युनूस शेख हिने दिली. रविवारी सोहेल मामा दुपारी व रात्री दोनवेळा घरी आला होता. रात्री दहा वाजेपर्यंत मी त्याला घरी जेवणासाठी आग्रह केला. त्याला घरी राहण्याची विनंती केली. मात्र तो मोठा मामा आरिफ यांच्या घरी गेला. माझ्या घरी सोहेलमामा राहिला असता तर आज वाचला असता, अशी प्रतिक्रिया देताना भाचा सरीफ युनूस शेख याच्या डोळ्यांतून अश्रुधारा झरत होत्या.


शेख कुटुंबाबरोबरच जुबेर कुरेशी कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याच इमारतीत जुबेर, त्याची दोन वर्षांची मुलगी फातिमा व पत्नी कैसर वास्तव्य करीत होते. जुबेर व फातिमा यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. कैसर हिला जखमी अवस्थेत कळव्याच्या इस्पितळात उपचाराकरिता दाखल केले होते. मात्र मंगळवारी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे कुरेशी कुटुंबातील तिघेही या दुर्घटनेत मरण पावले. आमीर मोमीन शेख यांना जखमी अवस्थेत ढिगाºयाखालून बाहेर काढले. त्यांच्या कुटुंबातील एक वृद्ध पती-पत्नी यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी आमीर हे पत्नी व दोन मुलांना तिच्या माहेरी मुंबईत सोडून आल्याने त्यांचे कुटुंब वाचले. मोहम्मद आलम अक्रम अन्सारी याच्या कुटुंबातील चार जण ढिगाºयाखाली अडकले असल्याने त्यांची चिंता अजून कायम आहे.

जिलानी इमारतीत एकूण २४ फ्लॅट होते. त्यापैकी दोन बंद होते तर २२ फ्लॅटमध्ये कुटुंबे वास्तव्य करून होती. अनेकांकडे नातलग वास्तव्याला आले होते. त्यामुळे ते कोण होते व कुणाकडे आले होते, याचा कुणालाच थांगपत्ता नसल्याने काही मृतदेहांची ओळख पटवण्यात अडसर येत आहेत.
सोमवारी रात्रीपर्यंत अरुंद गल्लीतून जवानांच्या मदतीने बचावकार्य सुरू होते. मात्र कोसळलेल्या इमारतीच्या टेरेसचा स्लॅब बचावकार्य करणाºया पथकावर कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याने मंगळवारी पोकलेनच्या साहाय्याने इमारतीकडे जाण्याकरिता रस्ता तयार केला व त्यानंतर पोकलेनच्या साहाय्याने ढिगारा उपसण्यास प्रारंभ केला.

Web Title: Some families became extinct in the Bhiwandi tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.