कळव्यात धर्मा निवास चाळीचा स्लॅब तळमजल्यावर कोसळला; दाम्पत्य जखमी
By जितेंद्र कालेकर | Updated: October 19, 2025 19:27 IST2025-10-19T19:27:08+5:302025-10-19T19:27:16+5:30
सहा सदनिकांना पालिकेने केले सील

कळव्यात धर्मा निवास चाळीचा स्लॅब तळमजल्यावर कोसळला; दाम्पत्य जखमी
ठाणे: कळवा ठाणे पूर्व येथील सूर्यनगर परिसरातील धर्मा निवास चाळीतील एका खोलीचा स्लॅब कोसळल्याने संजय (४०) आणि योेगिता उतेकर हे दाम्पत्य जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर चाळीतील सहा सदनिका सुरक्षिततेच्या कारणासाठी पालिका प्रशासनाने रिकाम्या करून सील केल्या आहत. येथीन रहिवाशांना अन्यत्र तात्पुरते स्थलांतरीत होण्याच्या सूचना केल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
धर्मा निवास या चाळीचे सुमारे २५ ते ३० वर्षे जुने बांधकाम आहे. सूर्यकांत वाळूंज यांच्या मालकीची आणि जयश्री शिंदे भाडेकरु असलेल्या चार क्रमांकाच्या खोलीचा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत संजय आणि योगिता उत्तेकर हे दाम्पत्य जखमी झाले. दोघेही जखमी स्लॅब कोसळल्यामुळे पहिल्या मजल्यावरुन रवींद्र कदम यांच्या मालकीच्या आणि संजय उतेकर भाडेकरु असलेल्या तळ मजल्यावर फ्लोअरिंगसहित पडले होते. स्लॅब कोसळल्यामुळे पहिल्या मजल्यावरील खोली तळ मजल्यावर कोसळली.
दोन्ही जखमींना तात्काळ कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी तसेच कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि टोरंट पॉवर कंपनीच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुरक्षिततेसाठी वीज पुरवठा तत्काळ खंडित केला होता. धर्मा निवास चाळीत २० सदनिका असून सुमारे ४५ ते ५० रहिवासी वास्तव्याला आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सहा सदनिका रिकाम्या करून त्या सील केल्या आहेत. संबंधित रहिवाशांना तात्पुरते नातेवाईकांकडे राहण्याचा सल्ला दिला आहे. इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने बांधकाम विभागाकडून पुढील तपासणी करून योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती ठामपा प्रशासनाने दिली.