ठाण्यात पूर्ववैमनस्यातून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 00:50 IST2022-01-21T00:47:43+5:302022-01-21T00:50:19+5:30
क्षुल्लक कारणावरुन इंदिरानगर येथील विजय यादव (३३) यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने हल्ला करीत त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणाºया सुरेश राजभर (२१, रा. इंदिरानगर, ठाणे) याच्यासह सहा जणांच्या टोळीला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली.

तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: क्षुल्लक कारणावरुन इंदिरानगर येथील विजय यादव (३३) यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने हल्ला करीत त्यांच्या खूनाचा प्रयत्न करणाºया सुरेश राजभर (२१, रा. इंदिरानगर, ठाणे) याच्यासह सहा जणांच्या टोळीला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. यातील तिघांना २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
विजय यादव हे १९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर येथील आई माता मेडिकल समोरील रोडवर उभे होते. त्याचवेळी १८ जानेवारी रोजी झालेल्या भांडणारच्या रागातून अमन गुप्ता, निलेश यादव, अमरजित उर्फ मटरू यादव आणि मुन्ना अशा सहा जणांच्या टोळक्याने आपसात संगनमत करून लाकडी बांबू आणि लोखंडी रॉडने त्याला जबर मारहाण केली. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला आणि पाठीवर गंभीर जखमा केल्या. तसेच चाकूने डाव्या डाताला गंभीर जखमा करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याचीच गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे यांच्या पथकाने इंदिरानगर येथील सुरेश राजभर तसेच अमरजित यादव(२१), अमन गुप्ता (१९) आणि अन्य तीन अल्पवयीन अशा सहा जणांना अटक केली आहे. तीन अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.