Sister's haldi ceremony brother dances with a lighter like a gun; The video of the incident went viral | बहिणीच्या हळदीत भावाचा बंदुकीसारखं लायटर घेऊन डान्स; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

बहिणीच्या हळदीत भावाचा बंदुकीसारखं लायटर घेऊन डान्स; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

ठळक मुद्देहुबेहूब बंदुकीसारखे दिसणारे हे लायटर्स दुकानात किंवा अगदी ऑनलाईन खरेदीच्या वेबसाईट्सवरही ५०० ते ६०० रुपयात सहज उपलब्ध होतात. याच लायटर्सचा वापर एखाद्याला घाबरवून लुटण्यासाठीही सहज होऊ शकतो.

अंबरनाथ: बहिणीच्या लग्नात भावाने बंदुकीसारखं दिसणारं लायटर घेऊन डान्स केल्याची घटना अंबरनाथ तालुक्यात घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली. मात्र ती बंदूक नसून लायटर असल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं.
      

अंबरनाथ तालुक्यात काकोळे गावाजवळ गोरपे नावाचं गाव असून या गावातील एका मुलीच्या हळदीनिमित्त ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी हा कार्यक्रम सुरु असताना वधूच्या चुलत भावाने कुणाच्यातरी खांद्यावर बसून डान्स केला, आणि हवेत बंदूक नाचवली. या प्रकाराचा व्हिडीओ कुणीतरी चित्रित केला आणि तो व्हायरल झाला. हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचताच शिवाजीनगर पोलिसांनी तपस करत बंदूक नाचवणाऱ्या भावाची त्याच्या बंदुकीसह पोलीस ठाण्यात वरात आणली. मात्र पुढील तपासात त्याने नाचवलेली बंदूक ही प्रत्यक्षात सिगारेट पेटवण्याचा लायटर असल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी ही बंदूक जमा करून घेत वधूच्या भावाला समज देऊन सोडून दिले. या प्रकारामुळे पोलिसांच्या डोक्याला मात्र मोठा ताप झाला. हुबेहूब बंदुकीसारखे दिसणारे हे लायटर्स दुकानात किंवा अगदी ऑनलाईन खरेदीच्या वेबसाईट्सवरही ५०० ते ६०० रुपयात सहज उपलब्ध होतात. याच लायटर्सचा वापर एखाद्याला घाबरवून लुटण्यासाठीही सहज होऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टींवर बंदी घालण्याची गरज व्यक्त होतेय.

Web Title: Sister's haldi ceremony brother dances with a lighter like a gun; The video of the incident went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.