धक्कादायक! ठाण्यात परेरानगरमध्ये गावठी दारुची तस्करी: एकाची धरपकड
By जितेंद्र कालेकर | Updated: June 4, 2020 22:08 IST2020-06-04T22:02:22+5:302020-06-04T22:08:08+5:30
एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीला ठाण्यात अजूनही बंदी आहे. तर दुसरीकडे चक्क कंटेनमेंट झोन असलेल्या परेरानगर भागातच दारुची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून गावठी दारुसह कारही जप्त करण्यात आली आहे.

वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यातील परेरानगरमध्ये एका कारमधून गावठी दारुची तस्करी करणारे दोघेजण गस्तीवरील पोलिसांना पाहून पसार झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या कारमधून २७० बाटल्यांमधील गावठी दारुसह कार जप्त करण्यात केली असून आकाश वीर (२२) याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्तकनगर भागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आणि निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे पोलीस हवालदार किशोर गायकवाड आणि राहूल थोपे हे त्यांच्या पथकासह ४ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गस्त घालीत होते. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी लोकमान्यनगरचा पाडा क्रमांक तीन हा परिसर ठाणे महापालिकेने कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे या भागात परेरानगर परिसरात लाकडी बांबूंचे बॅरिकेटस लावण्यात आलेले आहेत. गावठी दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्या या दोघांनी वर्तकनगर पोलिसांच्या पथकाला पाहिले. पोलीस आपल्या वाहनाची तपासणी करतील या भीतीनेच या दारु तस्करांनी तिथून पलायन केले. चौकशीत या गाडीचा चालक आकाश वीर याला ताब्यात घेतले. त्याला बेकायदेशीर दारु वाहतूक केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. या कारमधून ९० एमएलच्या २७० गावठी दारुच्या बॉटल पोलिसांनी जप्त केल्या आहेत. हा माल कोणी आणि कोणाकडून आणला होता, याची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.