धक्कादायक! शिवी दिल्याच्या गैरसमजूतीतून ठाण्यात एकावर चाकूने खूनी हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 23:47 IST2021-07-26T23:44:38+5:302021-07-26T23:47:54+5:30
शिवी दिल्याच्या गैरसमजूतीतून लोकमान्यनगर येथील निलेश मोरे (३६) यांच्यावर चाकूने खूनी हल्ला करणाऱ्या महेश उर्फ मारी सोनकवडे (२५, रा. लोकमान्यनगर) आणि शिवकुमार गुप्ता (२१, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या दोघांनाही सोमवारी पहाटेच्या सुमारास वर्तकनगर पोलिसांनी अटक केली.

वर्तकनगर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: शिवी दिल्याच्या गैरसमजूतीतून लोकमान्यनगर येथील निलेश मोरे (३६) यांच्यावर चाकूने खूनी हल्ला करणाऱ्या महेश उर्फ मारी सोनकवडे (२५, रा. लोकमान्यनगर) आणि शिवकुमार गुप्ता (२१, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या दोघांनाही सोमवारी पहाटेच्या सुमारास वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्यांना २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मोरे आणि त्यांचा मित्र अरविंद उतेकर असे दोघेजण २५ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार येथील रस्त्याच्या कडेला उभे राहून मोबाईलवरील गेम खेळत होते. त्याचवेळी त्यांच्या ओळखीचे महेश सोनकवडे आणि शिवकुमार हे रिक्षाने तिथून जात होते. दरम्यान, महेश आणि मोरे यांच्या भावाबरोबर दोन वर्षांपूर्वी भांडण झाल्याच्या रागातून तसेच मोरे यांनी त्यांच्या पत्नीला दिलेली शिवी ही आपल्यालाच दिल्याचा समज महेश आणि शिवकुमार यांनी केला. त्यामुळेच महेशने मोरे यांच्या कमरेवर चाकूने वार करुन तिघून गेले. त्यानंतर त्यांनी त्यांची रिक्षा ही विश्वकर्मा मंदिराच्या गेटवर थांबवून पुन्हा मोरे यांच्याकडे येऊन शिवीगाळ करीत त्यांना चाकूने मानेजवळ, खांद्यावर तसेच डोक्यावर भोसकून खूनी हल्ला केला. त्याचवेळी मोरे यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेले त्यांचे मित्र संकेत जाधव यांच्याही उजव्या हातावर चाकूने वार केले. तर शिवकुमार याने बघून घेतो, घरात शिरुन मारुन टाकू, अशी मोरे यांना धमकी देऊन पळून गेले. या हल्ल्यानंतर मोरे यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन ढोले यांच्या पथकाने महेश आणि शिवकुमार या दोघांनाही अटक केली आहे.