धक्कादायक! ठाण्यात झाडाची फांदी पडून दांम्पत्यासह चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 21:41 IST2020-11-08T21:29:35+5:302020-11-08T21:41:07+5:30
नौपाडयातील गोखले रस्त्यावर झाडाची फांदी पडून झालेल्या विचित्र अपघातामध्ये मोटारसायकलीवरुन जाणाऱ्या संदीप बंगेरा (४७) आणि जया बंगेरा (४७) या दाम्पत्यासह चौघेजण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तसेच नौपाडा पोलिसांनी यावेळी मदतकार्य राबवून जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

महिला गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: नौपाडयातील गोखले रस्त्यावर झाडाची फांदी पडून झालेल्या विचित्र अपघातामध्ये मोटारसायकलीवरुन जाणाºया संदीप बंगेरा (४७) आणि जया बंगेरा (४७, रा. विजयनगरी, घोडबंदर रोड, ठाणे) या दाम्पत्यासह चौघेजण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. जया यांच्या डोक्याला जबर मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या आहे.
ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार नौपाडयातील गोखले रस्त्यावर हस्तकला दुकानाजवळील झाडाची फांदी अचानक कोसळली. यात दुचाकीवरुन जाणाºया बंगेरा दाम्पत्यासह रिक्षा चालक वासीम (२३, रा. राबोडी, ठाणे) आणि पादचारी ३३ वर्षीय सोनवणे ही महिला असे चौघेजण जखमी झाले. या चौघांवरही एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. घटनास्थळी ठाणे अग्निशमन दल तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने मदतकार्य केले. काही काळा या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. झाडाच्या फांद्या बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.